Pune News : चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी पुणेकरांचा मूक मोर्चा; बालगंधर्व चौक भावनांनी दाटला
चिमुकलीला न्याय मिळावा आणि अशा घटनांवर कठोर कारवाई व्हावी, या एकाच भावनेतून पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे या मूक मोर्चातून पाहायला मिळाले.

पुणे : अत्याचार प्रकरणातील चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविवारी सायंकाळी पुण्यात हजारो नागरिकांनी शांततापूर्ण मूक मोर्चा काढत संताप व्यक्त केला. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला हा मोर्चा साडेसात वाजता समाप्त झाला. संपूर्ण मोर्चादरम्यान बालगंधर्व चौक आणि परिसर भावूक वातावरणाने भारावून गेला होता.
डीएसके धायरी परिसरासह शहरातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने बालगंधर्व चौकात दाखल झाले होते. जंगली महाराज रस्ता ते सावरकर पुतळा परिसरात ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली.
मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून आणि हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त केला. “नराधमाला फाशी द्या”, “चिमुकलीला न्याय द्या” अशा आशयाचे फलक हातात घेत नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोर्चाच्या अग्रभागी मोठा बॅनर घेण्यात आला होता. त्यावर “नराधमाला फाशी द्या, चिमुकलीला न्याय द्या, घटनेचा निषेध” असा संतप्त संदेश लिहिण्यात आला होता.
मोर्चामध्ये सुरुवातीला महिलांचा सहभाग होता, त्यानंतर पुरुष आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चा पुढे सरकत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सहभागी नागरिकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येत होते.
यावेळी चिमुकलीच्या वडिलांनी अत्यंत भावूक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “माझ्या चिमुकलीला न्याय मिळेल. ११ तारखेपर्यंत पोलिसांकडून कोर्टात भक्कम पुरावे सादर केले जातील. मला न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आर्त हाकेमुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
विशेष म्हणजे, मोर्चामध्ये शिस्तीचे काटेकोर पालन करण्यात आले. एका बाजूने मोर्चा सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली होती. पोलिस प्रशासनानेही योग्य नियोजन करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
चिमुकलीला न्याय मिळावा आणि अशा घटनांवर कठोर कारवाई व्हावी, या एकाच भावनेतून पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे या मूक मोर्चातून पाहायला मिळाले.





