Pune News : दाखले मिळण्यास अडचणी कायम; सर्व्हरमधील तांत्रिक समस्या अजूनही जैसे थे !
महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या महाआयटीच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्या अजूनही दूर न झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळण्यास विलंब होत आहे.

Pune News : महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या महाआयटीच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्या अजूनही दूर न झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळण्यास विलंब होत आहे.
विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने कागदपत्रांच्या अभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही समस्या कधी दूर होणार आणि आम्हाला दाखले मिळणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत.
राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून जात पडताळणी दाखले – प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येतात.
मागील महिन्यात महाआयटीचे सर्व्हर सुमारे सात ते आठ दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यंत्रणेच्या अपग्रेडेशनसाठी हे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, अद्यापही या सर्व्हरच्या गतीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. सर्व्हर संथ झाल्याने अर्ज स्विकारण्यात अडचणी येत आहेत. पर्यायी विद्यार्थ्यांचे अर्जच स्विकारले जात नसल्याने त्यांना अर्ज केल्याची पोहोच पावती सुध्दा मिळत नाही.
प्रवेश घेतेवेळी दाखल्यांसाठी अर्ज केल्याची पावती जोडली तरी प्रवेश निश्चित होतो. नंतर दाखले महाविद्यालयात जमा केले तरी चालते. मात्र अर्जच स्विकारले जात नसल्याने विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे.





