Pune News : वर्षाची तयारी, यूपीत मुक्काम अन् पुण्यात परतताच ‘टार्गेट’ फिक्स; आंदेकर खून प्रकरणानंतरचा रक्तरंजित संघर्ष कायम
माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर सुरू झालेले टोळी संघर्षाचे रक्तरंजित सत्र अद्याप कायम आहे.

Pune News : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर सुरू झालेले टोळी संघर्षाचे रक्तरंजित सत्र अद्याप कायम आहे. या प्रकरणातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ अक्षय मस्केवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामागे आंदेकर टोळीचे वर्षापासूनचे नियोजन असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, चार ते पाच महिन्यांपूर्वीच एका मित्राने अक्षयला तुझ्या मागावर असल्याचा इशारा दिला होता.बुधवारी (दि. २०) सातारा रोडवर अक्षय मस्केवर गोळीबार करून शस्त्रांनी वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
सुदैवाने तो बचावला आहे. तपासातील माहितीनुसार, हल्ल्याच्या एक दिवस आधी अक्षयने पत्नीशी बोलताना दोन दिवसांपासून काहीजण माझ्या पाळतीवर आहेत. ते दगाफटका करू शकतात, अशी भीती व्यक्त केली होती.
त्यापूर्वी एका मित्राने आंदेकर टोळी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचा इशारा दिला होता. या हल्ल्यामागे रेकॉर्डवरील गुन्हेगार आवेज शेख याची प्रमुख भूमिका असल्याचे दिसते.
आवेज हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय मानला जातो. त्याच्यावर यापूर्वी कोंढवा गोळीबार प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. त्यावेळी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाईही केली होती.
नातेवाईक लक्ष्य
वनराज आंदेकरच्या खुनानंतर सुरू झालेल्या टोळी संघर्षात आरोपींच्या नातेवाईकांनाही लक्ष्य करण्यात आहे. याआधी आयुष कोमकर, गणेश काळे यांची हत्या झाली होती. तसेच सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्या नातेवाईकांनाही लक्ष्य करण्याचा कट होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
अक्षय मस्केवरील हल्ल्यानंतर या प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, टोळी संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
वर्षाचे नियोजन
वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर आंदेकर टोळीने प्रतिशोधाची मालिका सुरू केली. आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा खून झाल्यानंतर आवेज शेख काहीजणांसह फरार झाला होता. त्यांनी पाच ते सहा महिने उत्तर प्रदेशात मुक्काम ठोकला.
दरम्यान, कारागृहात जाण्यापूर्वी कृष्णा आंदेकरने काही पिस्तुले व हत्यारे आवेजकडे दिल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातून परतल्यानंतर आवेजने पुन्हा टोळी सक्रिय करत अक्षयवर लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी काहीजणांना अक्षयच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचे काम दिले होते.
अखेर बालाजीनगरमध्ये अक्षय एकटा सापडताच त्याच्यावर हल्ला चढवला. दोन पिस्तुलांतून गोळीबार केला असून, त्यातील एक पिस्तूल स्वतः आवेजच्या हातात होते. त्याचवेळी इतर साथीदारांनी धारदार शस्त्रांनी अक्षयवर वार केले.





