Pune Book Festival: पुणे तीन डिसेंबरसाठी सज्ज
Pune Book Festival:

तासभर शहरात शांतता, पुणेकर वाचन करणार
Pune Book Festival: धावपळीच्या शहरी दिनक्रमातही वाचन संस्कृती अधिक घट्ट करण्यासाठी आणि आगामी पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत संपूर्ण शहरात शांतता… पुणेकर वाचत आहेत हा सामूहिक वाचन उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमात नागरिकांनी आपण जिथे असू, तिथे आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे असून, वाचन करतानाचे फोटो संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव १२ ते २० डिसेंबरदरम्यान फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, ग्रंथालये, सरकारी व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, तसेच बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवरही सामूहिक वाचनाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही पुणेकरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
असे पाठवा वाचनाचे फोटो
३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत पुस्तक वाचतानाचा फोटो काढून नागरिकांनी [https://photoupload.pbf26.in](https://photoupload.pbf26.in) या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. त्यासाठी क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध आहे.
हा लोकांचा महोत्सव आहे. यंदा महोत्सवात अकराशे दालने असून, वाचन चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमात तीन डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या वेळेत नागरिकांनी पुस्तक वाचून त्याचा फोटो अपलोड करावा. यातून पुण्याला पुस्तकांची राजधानी ही ओळख मिळवून देण्यासाठी मदत होईल.
– राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव





