Rajesh Sharma : “कीटक चावल्यामुळे नव्हे तर..”; अभिनेते राजेश शर्मा यांचा मोठा खुलासा, दोन महिन्यानंतर सांगितलं आजारपणाचं खरं कारण
Rajesh Sharma : राजेश शर्मा यांनी सांगितले की, कोलकात्याला परतल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना मधुमेह असून त्यावेळी रक्तातील साखरेची पातळीही वाढली होती.

Rajesh Sharma : अभिनेता राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबाबत काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका विषारी किड्याने किंवा कोळ्याने चावा घेतल्याने राजेश शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते. या घटनेनंतर त्यांच्या शरीरात संसर्ग झाल्याचेही सांगण्यात आले होते. तसेच त्यांची प्रकृती खालावती असल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता स्वतः राजेश शर्मा यांनी या वृत्तावर स्पष्टीकरण देत महत्वाचा खुलासा केला आहे.
राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबाबत त्यांची जवळची मैत्रीण आणि दिग्दर्शिका सुदीपा चॅटर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. हैदराबादमध्ये ‘फौजी’च्या शूटिंगदरम्यान विषारी किडा किंवा कोळी चावल्यामुळे अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. मात्र, काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती. त्यामुळे राजेश शर्मा यांना नेमकं काय झालं आहे याविषयी संभ्रम होता.
अखेर आता जवळपास दोन महिन्यांनंतर राजेश शर्मा यांनी स्वतः त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. ‘फौजी’च्या शूटिंगदरम्यान आपल्याला कोणताही किडा चावला नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच या घटनेचा प्रभास किंवा चित्रपटाच्या टीमशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी राजेश शर्मा यांनी संवाद साधला. किडा चावल्याच्या वृत्तावर बोलताना राजेश शर्मा म्हणाले की, “ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. प्रभास किंवा चित्रपटाची संपूर्ण टीम यासाठी अजिबात जबाबदार नाही. हैदराबादमधील शूटिंगदरम्यानही असे काही घडले नाही.”
त्यांच्यावर उपचार पूर्ण झाले असून आता ते हळूहळू बरे होत आहेत. येत्या आठवडाभरात पुन्हा कामावर परतण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांच्या शरीरात नेमका संसर्ग कशामुळे झाला, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही.
राजेश शर्मा यांनी सांगितले की, कोलकात्याला परतल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना मधुमेह असून त्यावेळी रक्तातील साखरेची पातळीही वाढली होती. सुरुवातीला त्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, त्यांना बऱ्याच काळापासून उजव्या पायाच्या त्वचेचा त्रास होता आणि त्याच ठिकाणाहून संसर्ग सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
सुदीपा चॅटर्जी यांनी केलेल्या पोस्टबद्दल विचारण्यात आले असता राजेश शर्मा यांनी त्या आपल्या जवळच्या मैत्रीण असल्याचे सांगितले. त्यांच्या काळजीपोटी त्यांनी ती पोस्ट केली होती. मात्र, त्यांना चुकीची माहिती मिळाल्याने त्यांनी किडा चावल्याचा उल्लेख केला, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजेश शर्मा लवकरच ‘हैवान’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘हैवान’ हा मोहनलाल यांच्या ‘ओप्पम’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.






