Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Mahajyoti : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक केंद्रावर महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत संगणक आणि तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ झाला. परीक्षा रद्द करण्यात आली असून पुनर्परीक्षेची मागणी होत आहे.

Mahajyoti : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेत पहिल्याच दिवशी पुण्यातील आंबेगाव बुद्रुक केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला. पुरेशा संगणकांचा अभाव आणि गंभीर तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
परीक्षा केंद्राबाहेर संतप्त विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर वाढता तणाव पाहता या केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महाज्योतीतर्फे ७ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी ही ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आंबेगाव केंद्रावर नियोजित वेळेत परीक्षा सुरू न झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. या गोंधळाची दखल घेत आमदार रोहित पवार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी महाज्योती प्रशासनाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचा प्रश्न लावून धरला.
या घटनेमुळे बाधित झालेल्या एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये. महाज्योतीने आंबेगाव केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची समान संधी द्यावी, तांत्रिक बिघाडाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पुनर्परीक्षेची तारीख तातडीने जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.
”विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भवितव्याचा कोणत्याही प्रकारे बळी जाऊ नये. महाज्योती ही सामाजिक न्यायासाठी स्थापन झालेली संस्था असल्याने परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता असायला हवी. आंबेगाव प्रकरणातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशासनाने त्वरित न्याय दिला पाहिजे.”
— रोहन सुरवसे पाटील (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस)





