Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई
Kharadi:

२१ हजार चौ. फुट बेकायदा बांधकाम; तीन वेळा कारवाई केली तरी केले होते बांधकाम
Kharadi: खराडीतील खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानाच्या जागेवर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या परवानगीविना उभारण्यात आलेल्या सहामजली इमारतीवर अखेर महापालिकेने बुलडोझर चालवला आहे.
विशेष म्हणजे, बांधकाम विभागाने या बांधकामावर यापूर्वी जोत्यापर्यंत बांधकाम झाल्यानंतर तब्बल तीन वेळा कारवाई केली होती. मात्र, या कारवाईनंतरही येथे सहा मजली इमारत उभी करण्यात आल्याने महापालिकेच्या कारवाईला जुमानले नसल्याचे समोर आले आहे.
अखेर महापालिकेने सहा मजली इमारतीवर बुलडोझर चालवून ती पाडण्याचे काम सुरू असून, संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केल्यानंतरच कारवाई थांबविण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांनी दिली.
खराडीतील सर्व्हे क्रमांक ६३ आणि लाइन क्रमांक १२ येथील सुमारे २१ हजार चौरस फुटांचा भूखंड विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. हा भूखंड अनेक वर्षांपासून मोकळा असल्याची संधी साधून दोन विकासकांनी यावर अतिक्रमण करत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता येथे बांधकाम सुरू केले.
नागरिकांनी याबाबत महापालिका आयुक्त तसेच बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्यानंतर बांधकाम विभागाने तीन वेळा अतिक्रमणविरोधी कारवाई केली. मात्र, त्यानंतरही बांधकाम थांबले नाही. गणेश गायकवाड या विकसकासह इतरांनी मिळून बांधकाम केल्याचे शेंडे म्हणाले. तसेच महापालिकेच्या नोटीसीनंतर देखील बांधकाम केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असून, कारवाईचा सर्व खर्च नियमानुसार वसूल केला जाईल, असे शेंडे यांनी नमूद केले.
महापालिकेने दोनदा कारवाई केली असतानाही सहा मजली इमारत उभी राहिलीच कशी, हे सहा मजले बांधून होईपर्यंत महापालिकेने पुन्हा लक्ष का नाही दिले, आरक्षित भूखंडावर एवढे मोठे बांधकाम उभे राहत असताना संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे लक्ष का गेले नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामागे राजकीय वरदहस्त होता का, तसेच कारवाईसाठी एवढा विलंब का झाला, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
महापालिकेने विकास आराखड्यात या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. ती जागा खासगी मालकीची असून, अद्याप महापालिकेच्या ताब्यात नाही. परंतु कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले. बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे. सहा मजल्यांचे बांधकाम होईपर्यंत संबंधित अधिकारी काय करत होते. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे.
– अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे महापालिका.





