Khadakwasla Dam: पुणेकरांवर पाणी संकट! खडकवासला धरणात केवळ ‘इतका’ साठा; १५ दिवसांनी होणार मोठा निर्णय
Khadakwasla Dam: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ टीएमसीने पाणीसाठा कमी; उपलब्ध साठा अधिक काळ पुरवण्यासाठी पुणे महापालिकेकडून पाणी कपातीचे नियोजन.

Khadakwasla Dam – खडकवासला धरणसाखळीत गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे सात टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी तो केवळ चार टीएमसीपर्यंत खाली आला आहे. उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ पुरविण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या, अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पाणी कपात सुरू झाल्यानंतर १५ दिवसांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाईल,
अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानुसार, पाणी कपातीपूर्वी दररोज सुमारे १,४५० टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता ही संख्या वाढून १,६६५ फेऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. ज्या भागांत पाणीपुरवठ्याच्या अडचणी अधिक आहेत, तेथे टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही नागपुरे यांनी सांगितले.
नागरिकांची आंदोलने…
एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर घोरपडीतील भीमनगर परिसरात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आताच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यापूर्वीही आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
खडकवासला धरणसाखळीत केवळ चार टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी कपात केली आहे, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. कमी दाबाने पाणी येण्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १५ दिवसांनी स्थितीचा आढावा घेऊन पाणी बचत आणि पुढील नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल.
– मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका




