HCMTR : एचसीएमटीआरचे चार पॅकेजमध्ये काम!
HCMTR :

आयुक्त नवल किशोर राम, कमी भूसंपादनाच्या दोन मार्गांच्या निविदा काढणार
निविदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात
पहिल्या टप्प्यात दोन पॅकेजच्या कामांना प्राधान्य
सिंहगड रस्ता–स्वारगेट–बिबवेवाडी–लुल्लानगर मार्गाचा समावेश
HCMTR : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्गाचे (एचसीएमटीआर) काम चार पॅकेजेसमध्ये केले जाणार आहे. यातील कमीत कमी भूसंपादन असणाऱ्या आणि अस्तित्वातील रस्त्यावरील दोन पॅकेजसाठीच्या निविदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
‘एचसीएमटीआर’च्या पहिल्या टप्प्यात सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते स्वारगेट आणि तेथून बिबवेवाडी ते लुल्लानगर ही एक आणि विमाननगर ते बॉम्बे सॅपर्स व्हाया विश्रांतवाडी या दोन पॅकेजेसचा समावेश असेल, असेही राम यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासकीय पातळीवर या प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या दालनात झालेल्या बैठकीला पालिकेच्या अधिकार्यांसह सभागृह नेते गणेश बिडकर हे उपस्थित होते. ‘एचसीएमटीआर’ साठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामासाठी लागणार्या निधीबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू आहे.
अधिकारी सातत्याने जागा पाहणी करीत असून, सुमारे ४४ किमीच्या या प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकारच्या जमिनीसोबतच खासगी जागांचेही संपादन करावे लागणार आहे. यापैकी बर्यापैकी मार्गिका या अस्तित्वातील २४ मीटर रस्त्यावर आहेत. जेथे कमीत कमी अडचणी आहेत, त्या मार्गिकांची दोन पॅकेजमध्ये पुढील महिन्यांत निविदा काढण्यात येईल, असे राम यांनी नमूद केले.
पहिल्या पॅकेजमधील रस्ता सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानापासून सारसबाग येथे कॅनॉल रस्त्यावरून सातारा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण चौक तेथून सातारा रस्ता मार्गाने पुष्पमंगल कार्यालय येथून बिबवेवाडी तेथून केंजळेनगर मार्गाने गंगाधाम चौकातून सरळ लुल्लानगरपर्यंत जाईल. सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटदरम्यान मेट्रो प्रकल्प असल्याने या भागात दुमजली पूल उभारण्यात येणार आहे.
दुसऱ्या पॅकेजमधील रस्ता विमाननगर ते बॉम्बे सॅपर्सपर्यंत असेल. साधारण प्रत्येकी दहा ते बारा किलोमीटरच्या या टप्प्यांमध्ये भूसंपादन आणि अन्य अडचणी कमी आहेत. त्यामुळे या टप्प्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. उर्वरित दोन पॅकेजेससाठी सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे संपादन करावे लागणार आहे. त्यासाठी आराखडा तयार केला जात आहे, असे राम यांनी सांगितले.
‘एचसीएमटीआर’ प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. या प्रकल्पासाठी तसेच आवश्यक भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून विशेष सहकार्य करण्यात येईल. तसेच, निधी उभारण्यासाठीही वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येईल.
– गणेश बिडकर, सभागृह नेते, पुणे महापालिका





