Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा
Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडी कार्यक्रमामुळे 5 सप्टेंबरला सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार. पर्यायी मार्गांची माहिती जाणून घ्या.

Pune Traffic Changes : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हडपसरमध्ये आज (5 सप्टेंबर) दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
शिवधुंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमासाठी माळवाडी रोडवरील कुबेरा संकुल ते साधना सोसायटी हा रस्ता आज सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच हमराज ग्रुपतर्फे आयोजित कार्यक्रमामुळे मित्तल ज्वेलर्स रोड ते मनपा शाळा क्रमांक 32 कडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी साधना सोसायटीकडे जाणाऱ्या नागरिकांनी रवी दर्शनमार्गे कॅनॉल रोडने सिरम गेट रस्त्याचा वापर करावा. तर मनपा शाळा क्रमांक 32 कडे जाण्यासाठी वैभव थिएटर–सम्राट गार्डनमार्गे कॅनॉल मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक परिस्थितीनुसार आवश्यकतेनुसार बदल केले जाऊ शकतात. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचा योग्य बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





