Constitution Day: संविधानाच्या मूल्यांचा शहरभर जागर!
Constitution Day:

उद्देशिकेचे सामूहिक वाचन; विविध संस्था, संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Constitution Day: भारतीय संविधान दिनाचे (दि. २६) औचित्य साधत शहरात अनेक संघटनांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार देणारे आणि लोकशाहीला बळकटी देणारे महान दस्तऐवज आहे. संविधानातील मूल्यांचे जतन करणे आणि ती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगितले.
पुणे महापालिकेने भवनासमोरील मैदानात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांचे स्मरण यावेळी केले.
या कार्यक्रमास महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, गटनेते सोपानकाका चव्हाण यांच्यासह पुणे महापालिकेचे सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते.
यानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण व अशोक शिरोळे यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अशोक कांबळे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करून संविधान दिन साजरा केला.
या कार्यक्रमास आसित गांगुर्डे, भगवान गायकवाड, महेंद्र कांबळे, सुगत दसाडे, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश अल्हाट, वसंत बनसोडे, संजय जाधव आदी उपस्थित होते.
किल्ले शिवनेरीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या उपस्थितीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता अभियानाचे लोकार्पण झाले. या वेळी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनदेखील झाले. किल्ले राजगड व लोहगडावर संविधानाचा जागर करीत पोवाड्यातून सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाहीचा संदेश देण्यात आला.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातही संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले. सोबतचं मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मृत, पीडित आणि शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम एन. सोनवणे, अधिष्ठाता प्रा. सी. वाय. पाटील, प्रा. रश्मी कुलकर्णी, विविध विभागांचे प्रमुख, अध्यापक, विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा ते रेल्वे स्थानकाजवळील बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत संविधान रॅली काढली. रॅलीला उपमहापौर परशुराम वाडेकर, आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, बार्टीचे उपायुक्त रवी कदम, विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभाग घेतला.
भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतही मातृशक्तीने मातृशक्तींच्या सक्षमीकरणासाठी संविधानाचे वाचन असा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्देशिका वाचनासह २६/११च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील हुताम्यांना भावांजली वाहिली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे, मोतीबाग नगर कार्यवाह प्रमोद वसगडेकर, संस्थेचे विश्वस्त प्रकाश आठवले, अध्यक्ष राजीव जोशी, कार्यवाह प्रसाद खेडकर, डॉ मोरेश्वर गद्रे आदी उपस्थित होते.
पुणे मेट्रो भवनातही संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले. यावेळी पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिवाय रिपब्लिकन सेना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स, भाजप शासकीय योजना आघाडी, भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, कै लक्ष्मण सवाणे प्रतिष्ठान, झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित सेना, संविधान सन्मान संरक्षण दल, कावेरी महाविद्यालय आणि इतर अनेक संस्थांकडून संविधान दिन साजरा करण्यात आला.





