Pune news : कचऱ्यात गेलेली सोन्याची अंगठी शोधून स्वच्छ सेविकेने केली परत; पूजा ढावरे यांच्या कामाचे कौतुक !
अंगठी कचऱ्यात गेल्याचे समजताच पूजा यांनी वेळ न दवडता कचरा पोत्यावर ओतून शोध सुरू केला. सुमारे अर्धा तास शोध घेतल्यानंतर त्यांना अंगठी सापडली. त्यांनी ती तत्काळ संबंधित नागरिकाकडे सुपूर्द केली.

Pune news : ओल्या कचऱ्यात चुकून गेलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी तब्बल अर्धा तास शोधून नागरिकाला परत करणाऱ्या स्वच्छ सेविका पूजा ढावरे यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. दत्तनगर परिसरातील रविराज सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पूजा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दत्तनगर परिसरात पूजा ढावरे या घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम करतात. नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी साडेआठ वाजता रविराज सोसायटीमधील कचरा संकलित केला. मात्र, दुपारी बाराच्या सुमारास एका नागरिकाची सोन्याची अंगठी चुकून ओल्या कचऱ्यात गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
अंगठी कचऱ्यात गेल्याचे समजताच पूजा यांनी वेळ न दवडता कचरा पोत्यावर ओतून शोध सुरू केला. सुमारे अर्धा तास शोध घेतल्यानंतर त्यांना अंगठी सापडली. त्यांनी ती तत्काळ संबंधित नागरिकाकडे सुपूर्द केली.
“आम्ही अनेक वर्षांपासून या परिसरात कचरा संकलनाचे काम करत आहोत. येथील नागरिक आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत. त्यांच्या आमच्यावरील विश्वासाला पात्र ठरणे, ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कचऱ्यात गेलेली मौल्यवान वस्तूही आम्ही प्रामाणिकपणे शोधून परत करतो,” असे पूजा ढावरे यांनी सांगितले.
अंगठी हरविल्याचे सांगताच पूजा यांनी आईच्या मदतीने ती शोधून परत केली. त्या जबाबदारीने काम करतात, हीच त्यांच्या कामाची खरी ताकद आहे, अशा शब्दांत रविराज सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.





