Tulapur: तुळापूरमध्ये शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला भीषण आग; दोन बैल, घोडीचा मृत्यू
Tulapur: “शेतकऱ्यांसाठी जनावरे ही केवळ संपत्ती नसून कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असतात. तुळापूर येथील ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. शासनाने तातडीने मदत करून शिवले कुटुंबाला दिलासा द्यावा. आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी मी प्रशासनाशी समन्वय साधत आहे,” असे प्रदीप वसंतराव कंद यांनी सांगितले.

Tulapur: लोणीकंद – हवेली तालुक्यातील तुळापूर येथील शिवले वस्तीमध्ये शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला भीषण आग लागून दोन बैल व एका घोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या आगीत एक बैल गंभीर जखमी झाला असून शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रसिद्ध बैलगाडा मालक पोपट शिवले यांच्या गोठ्यात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने जनावरे वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, दोन बैल आणि एका घोडीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप वसंतराव कंद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शिवले कुटुंबीयांचे सांत्वन करत जखमी जनावराच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या.
यावेळी कंद यांनी प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच शासनाच्या विविध योजनांतून नुकसानग्रस्त कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
घटनास्थळी तुळापूरचे माजी सरपंच जयवंत शिवले, गणेश पुजारी, उद्योजक संजय चव्हाण, सोपान शिवले, पोलीस मित्र आण्णासाहेब शिवले यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेमुळे तुळापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला तातडीची मदत द्यावी – प्रदीप कंद
“शेतकऱ्यांसाठी जनावरे ही केवळ संपत्ती नसून कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असतात. तुळापूर येथील ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. शासनाने तातडीने मदत करून शिवले कुटुंबाला दिलासा द्यावा. आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी मी प्रशासनाशी समन्वय साधत आहे,” असे प्रदीप वसंतराव कंद यांनी सांगितले.






