Daund News: दौंड तालुक्यातील गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार उघड; डॉक्टरवर कारवाई होणार का? नागरिकांचा सवाल….
Daund News: अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याने या प्रकरणाची आर्थिक चौकशी करण्याचीही मागणी

मनोज खंडाळे
Daund News: दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्याचा चर्चेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका कथित डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गुप्तपणे रुग्णाच्या घरी जाऊन वा संबंधित दलाल वा डॉक्टर याच्या दवाखान्यात गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.या तपासणीसाठी तब्बल ३५ ते ५० हजार रुपये आकारले जात असून संबंधित डॉक्टर आणि दलाल यांना देखील त्यातील त्यांचा आर्थिक वाटा जात असल्याची धक्कादायक माहितीही पुढे येत आहे.
संबंधित व्यक्तीला बड्या राजकीय नेत्याचा आश्रय
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार नव्याने सुरू झालेला नसून गेल्या दहा बारा वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. संबंधित व्यक्तीला एका बड्या राजकीय नेत्याचा आश्रय मिळत असल्याने प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे का,असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पात्र डॉक्टर आहे की बनावट ओळख वापरून हा व्यवसाय करत आहे, याबाबतही आता शंका व्यक्त होत आहे.
संबंधित कथित डॉक्टर याचे गर्भलिंग निदान करणे आणि गर्भापात करणे पर्यंत याच डॉक्टरचे जाळे कार्यरत असून पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातही मोठे जाळे पसरवले असून यातून त्याने कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आपल्या स्वतःच्या, मित्रांच्या आणि नातेवाईक यांच्या नावावर केली असल्याची देखील आरोप नागरिक करत आहेत.
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा-
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (PCPNDT Act) हा स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अत्यंत कठोर स्वरूपाचा कायदा मानला जातो. या कायद्यांतर्गत गर्भलिंग तपासणी करणे, त्यासाठी प्रवृत्त करणे किंवा अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्रकारात सहभागी होणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून दोषी आढळल्यास वैद्यकीय परवाना रद्द करणे, तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची तरतूद देखील या कायद्यात आहे.
असे असतानाही उघडपणे हा प्रकार सुरू असून याला कायद्याची कसलीही भीती राहिली नसून नक्की कोणाच्या वरदहस्ताने हा गैरप्रकार सुरु आहे असा आरोप होत असल्याने आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील गभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात काही दलाल तसेच इतर डॉक्टरांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून हे एक संघटित रॅकेट असू शकते, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
हेही वाचा :






