Shirur News : ‘हर घर जल’ की ‘हर घर वणवण’? शिरूर तालुक्यात ‘जलजीवन मिशन’ कागदावरच; महिलांची पाण्यासाठी पायपीट
Shirur News : शिरूर तालुक्यात जलजीवन मिशनचे काम रखडले; कान्हूर मेसाईसह अनेक गावांत पाइपलाइन असूनही थेंबभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती.

Shirur News – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘हर घर जल’ मोहिमेअंतर्गत शिरूर तालुक्यातील गावांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला खरा, मात्र प्रशासकीय अनास्था आणि नियोजनाच्या अभावामुळे ही योजना रखडली आहे. ऐन उन्हाळ्यात नळाला पाणी येण्याऐवजी नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत असल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यातील कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, सविंदणे आणि कवठे येमाई या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पाइपलाइन, जलकुंभ आणि पंपगृहांची कामे सुरू झाली, पण ती अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत. परिणामी, कोट्यवधींचा खर्च होऊनही अनेक वस्त्यांवर अद्याप पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. थिटेवाडी बंधारा पूर्णपणे कोरडा पडला असून मेसाई देवी मंदिरामागील साठवण तलावातील पाणीसाठाही संपत आला आहे. गावठाणासह वाड्या-वस्त्यांवरील महिलांना पाण्यासाठी रणरणत्या उन्हात मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. काही गावांमध्ये ग्रामपंचायतींना आतापासूनच टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव द्यावे लागत आहेत.
आधी मंजूर झालेल्या योजना पूर्ण करा, मगच नवीन घोषणा करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. जुन्या योजनांची कामे अर्धवट असतानाच नवीन योजनांच्या घोषणा होत असल्याने नागरिकांकडून प्रशासनाची थट्टा उडवली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असून निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने ही अपूर्ण कामे पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू न केल्यास, तालुक्यातील विविध गावांमध्ये तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
जनतेचा संतप्त सवाल…
“गावोगावी पाइपलाइन टाकल्या गेल्या, जलकुंभही उभे राहिले; पण नळाला पाणी नेमके कधी येणार?” असा संतप्त सवाल शिरूर तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ आकडेवारीचा खेळ न खेळता प्रत्यक्ष पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.





