Koregaon Bhima : कोरेगाव भीमात गणेशोत्सवाची तयारी; पोलिसांकडून विसर्जन मार्गाची पाहणी
गणेश मंडळांनीही शिस्तीत मिरवणूक काढून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहून गणेश विसर्जन मिरवणूक काढावी.

Koregaon Bhima : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नवव्या दिवशी, मंगळवार दि. २२ रोजी होणार असल्याने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संपूर्ण विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली. तसेच भीमा नदीकाठच्या विसर्जन घाटाचीही पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, वीजवाहिन्या, अतिक्रमणे तसेच अन्य कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
कोरेगाव भीमा येथे विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यापूर्वी शिवजयंती, रामनवमी, भीमजयंती यांसह विविध उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले आहेत. त्याच धर्तीवर यंदाचा गणेशोत्सवही शांतता, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, तसेच पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून नियोजन करण्यात येत आहे. विसर्जन मार्गावरील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस हवालदार संदीप कारंडे, श्रावण गुपचे, विकास सरोदे, कोरेगाव भीमाचे सरपंच अनिकेत साहेबराव गव्हाणे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, विजय गव्हाणे, आरपीआय नेते राजेंद्र गवदे, सामाजिक कार्यकर्ते संपत गव्हाणे, नारायण ढेरंगे, प्रदीप काशिद, विवेक ढेरंगे, अविनाश गव्हाणे, शुभम गव्हाणे, योगेश मांझिरे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
– विसर्जन मार्ग स्वच्छ ठेवण्याची ग्रामपंचायतीची जबाबदारी
गणपती विसर्जन मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात येणार आहे. विसर्जनापूर्वी तसेच विसर्जनानंतर संपूर्ण मार्गाची स्वच्छता करण्यात येणार असून, विसर्जन काळात ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करतील. गावातील तसेच पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
– अनिकेत साहेबराव गव्हाणे, (सरपंच कोरेगाव भीमा)
कायद्याच्या चौकटीत राहून मिरवणूक काढावी
कोरेगाव भीमा येथील गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. गणेश मंडळांनीही शिस्तीत मिरवणूक काढून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहून गणेश विसर्जन मिरवणूक काढावी. कोणीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा अथवा कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– चंद्रशेखर यादव, (पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन)





