Indapur News : इंदापुरात पाण्यासाठी रणकंदन! खडकवासला कालव्याचा प्रश्न पेटला; शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
Indapur News : वेळेत आवर्तन न सुटल्यास गावपातळीवर मोठे आंदोलन छेडण्याची तयारी; राजकीय अनास्थेमुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक.

Indapur News – इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासकीय नियोजनाचा अभाव आणि सततच्या पाणीटंचाईमुळे खरिपापाठोपाठ रब्बी आणि उन्हाळी पिकेही करपू लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. वेळेत आवर्तन न सुटल्यास तालुक्यात मोठे जल आंदोलन छेडण्याचा इशारा गावागावातून दिला जात आहे.
खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हजारो एकरावरील ऊस आणि फळबागा पाण्याच्या अभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत. “इतर तालुक्यांना मुबलक पाणी दिले जाते, मात्र इंदापूरच्या वाट्याला नेहमीच अन्याय का?” असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाच्या या दुजाभावामुळे शेतकऱ्यांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा बालेकिल्ला असूनही येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासकीय पातळीवर योग्य पाठपुरावा होत नसल्याचा आरोप करत, काही गावांतील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच, पाणी न सुटल्यास तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा पवित्राही शेतकऱ्यांनी घेतला आहे.
नियोजनाचा अभाव की राजकीय अनास्था?
हजारो हेक्टरवरील पिकांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास इंदापूर तालुक्यातील हा पाणी प्रश्न आगामी काळात अधिक रौद्र रूप धारण करण्याची चिन्हे आहेत.





