Alandi : दिवाळी अंक वाचायला द्या, मुले मोबाईलपासून दूर होतील
Alandi : प्रभातच्या दिवाळी अंकात उच्च विचारांचे आणि दर्जेदार लेखन आहे. ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांपासून वाचक प्रभातचे वाचन करीत आहेत. प्रभातची भाषाशैली सोपी आणि ओघवती असल्याचेही काळे यांनी सांगितले.

आळंदी : मुलांना दिवाळी अंक वाचायला द्या. त्यामुळे त्यांची वाचनाची आवड वाढेल आणि ती मोबाईलपासून दूर होतील, असे मत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’चे संस्थापक प्रकाश तात्या काळे यांनी व्यक्त केले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र अलंकापुरीत दैनिक प्रभातच्या दिवाळी अंकाचा स्वागत सोहळा शुक्रवारी भांबुर्डेकर सराफ यांच्या दालनात उत्साहात पार पडला. प्रकाश तात्या काळे यांच्या हस्ते अंकाचे स्वागत करण्यात आले.
प्रभातच्या दिवाळी अंकात उच्च विचारांचे आणि दर्जेदार लेखन आहे. ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांपासून वाचक प्रभातचे वाचन करीत आहेत. प्रभातची भाषाशैली सोपी आणि ओघवती असल्याचेही काळे यांनी सांगितले. यावेळी ओंकार भांबुर्डेकर आणि कुणाल भांबुर्डेकर यांनी दिवाळी अंक ही केवळ लेखनाची संकलने नसून समृद्ध संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. कै. अनिल भांबुर्डेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली परंपरा आणि मूल्ये पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, शिवसेनेचे आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आळंदी शहराध्यक्ष सौरभ गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप गवते, बाळासाहेब वडगावकर, सुभाष दाभाडे, शिवसेना शाखाप्रमुख नितीन ननवरे, प्रल्हाद महाराज भोईबार, बी. के. चौधरी, भांबुर्डेकर सराफ ज्वेलर्सचे कुणाल भांबुर्डेकर, ओंकार भांबुर्डेकर, मातोश्री निर्मलाताई अनिल भांबुर्डेकर, अमृता कुणाल भांबुर्डेकर, निलेश ओंकार भांबुर्डेकर, ज्ञानेश्वर भागवत सुवर्णाकार, गिरीश सुधाकर जानवेकर, गणेश पवार, राज पवार, प्रवीण काकडे, सुनील ज्ञानेश्वर तापकीर, चैतन्य महाराज कबीर (लोंढे), ह. भ. प. विलास तात्या बालवडकर, पिंपरी-चिंचवड शहर लायन्स क्लबचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी, बालाजी सावंत, वेद कबीर (लोंढे), मनोहर दिवाने आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक उमरगेकर, बाळासाहेब वडगावकर, सौरभ गव्हाणे आणि बी. के. चौधरी यांनी दिवाळी अंकाला शुभेच्छा देत पत्रकार एम. डी. पाखरे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ज्येष्ठ पत्रकार एम. डी. पाखरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
दैनिक प्रभातच्या विशेष दिवाळी अंकास मनःपूर्वक शुभेच्छा! ज्ञान, विचार आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडविणारा हा अंक वाचकांसाठी आनंददायी, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण ठरो. या अंकाला भरभरून यश लाभो आणि पुढील वाटचाल अधिक समृद्ध होवो, ही सदिच्छा.
-राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, शिवसेना आळंदी शहरप्रमुख.





