Fire Incidents : पुणे-नगर हायवेवर ‘आगीचं तांडव’! धावत्या गाड्या होताहेत खाक; प्रशासनाचं दुर्लक्ष की आणखी काही?
Fire Incidents : केवळ वाहनेच नव्हे, तर घरे, गोडाऊन आणि शेतातील पिकेही जळून खाक; सणसवाडी-शिक्रापूर परिसरात दहशतीचे वातावरण.

Fire Incidents – सध्या उन्हाची तीव्रता वाढत असतानाच शिरूर तालुक्यात भर रस्त्यात वाहनांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे-नगर महामार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेक वाहने जळून खाक झाली असून, या वाढत्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३ एप्रिल रोजी शिक्रापूर येथे एका कंटेनरला, तर तुळापूर फाटा परिसरात एका बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी एक टेम्पो आगीत पूर्णपणे जळून खाक झाला होता, तर १३ मार्च रोजी रांजणगाव गणपती मंदिरासमोर एका बसला आग लागली होती. पुणे-नगर महामार्ग हा नेहमीच वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो. त्यामुळे एखाद्या वाहनाला आग लागल्यास घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब पोहोचण्यास मोठा विलंब होतो. या विलंबामुळे साधी आग रौद्र रूप धारण करते आणि पाहता पाहता संपूर्ण वाहन जळून खाक होते.
अनेकदा आगीत केवळ वाहनाचेच नव्हे, तर त्यातील प्रवासी, मौल्यवान वस्तू, कागदपत्रे आणि रोख रक्कमही जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहनांची नियमित देखभाल करणे आता अनिवार्य झाले आहे. शिरूर तालुक्यातील या आगीच्या घटना केवळ वाहनांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. अलीकडच्या काळात निवासी क्षेत्रे, दुकाने आणि गोदामांनाही आगी लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
शिरूर तालुक्यातील अलीकडील काळातील आगी
तालुक्यात केवळ वाहनेच नव्हे, तर धानोरे आणि फाकटे येथे दोन घरांना आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कोरेगाव भीमा व सणसवाडी येथील मोबाइल शॉपी, शिक्रापूरमधील भंगार गोडाऊन, कारेगावमधील विद्युत रोहित्र आणि सणसवाडीतील कंपनीच्या गोदामासह अनेक ठिकाणी शेतातील उभी पिकेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.





