प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पेरणेफाटा येथील विजयस्तंभाचा इतिहास हा मानवतेचा इतिहास असून, येथील लढ्यामुळेच भारताच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. येथील लढा हा प्रामुख्याने जातीप्रथेच्या अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात होता, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. १ जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.अभिवादन सोहळ्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले.मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेससोबतच्या चर्चेत आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. ज्या ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार होते, त्या जागा त्यांच्याकडे ठेवण्यात आल्या आहेत, तर ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मजबूत आहेत, अशा जागांवर आम्ही तडजोड केलेली नाही. कोरेगाव भीमा येथील हा ऐतिहासिक लढा समतेचा संदेश देणारा असून इथून मिळणारी ऊर्जा सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. “शौर्यदिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाने यावर्षी चांगली सोय केली आहे. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. वंचित बहुजन आघाडीने पक्षाबाहेरील उमेदवारांना संधी न देता केवळ आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली.” – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे