Kalas News : कळस परिसरात पावसाची दडी; पिके करपण्याच्या मार्गावर, खडकवासला कालव्याचे आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
Kalas News : इंदापूर तालुक्यातील कळस आणि परिसरात पावसाने ऐन हंगामात कमालीची दडी मारल्यामुळे तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Kalas News : इंदापूर तालुक्यातील कळस परिसरात पावसाने कमालीची दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी परिसरातील छोटे-मोठे बंधारे, ओढे, नाले आणि पाझर तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. (Kalas News)
खरीप हंगामातील बाजरी, मका यांसह जनावरांसाठी घेतलेली चारा पिकेही पाण्याअभावी करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. पावसाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता कमी होत असून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे. (Kalas News)
कळस गावाला पाणीपुरवठा करणारा पाझर तलावही पावसाअभावी कोरडा पडला आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Kalas News)
या पार्श्वभूमीवर खडकवासला कालवा आणि त्यावरील वितरिकांना तातडीने पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांकडून होत आहे. कालव्याचे आवर्तन सुरू करून त्यावरील वितरिका तसेच पाझर तलाव पाण्याने भरून देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Kalas News)
पावसाने आणखी दडी मारल्यास शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन खडकवासला कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (Kalas News)





