Dimbhe Manikdoh Tunnel: डिंभे-माणिकडोह बोगदा रद्द करा! चार तालुक्यांत जलसंकटाची भीती, दिलीप वळसे-पाटील आक्रमक
Dimbhe Manikdoh Tunnel: आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेरच्या भवितव्याचा प्रश्न; डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालवल्यास बोगद्याची गरजच नाही.

Dimbhe Manikdoh Tunnel – आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण आणि जुन्नर तालुक्यात असणारे माणिकडोह धरण या दरम्यान १६ किलोमीटर लांबीचा बोगदा करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या हालचालींमुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा बोगदा चुकीच्या पद्धतीने झाला तर भविष्यात चार तालुक्यांच्या शेतीसमोर गंभीर जलसंकट उभे राहील,
यासाठी बोगदा होऊ दिला जाणार नाही. असा इशारा माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवार, दि. २ दोन रोजी दिला. एकलहरे (ता. आंबेगाव) येथील हॉटेल रविकिरण येथे पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात,
जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णू काका हिंगे उपस्थित होते. डिंभे धरणाच्या तळातून बोगदा झाल्यास धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होऊन अवघ्या तीन महिन्यांत धरण खाली होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेतीच्या पाण्यावर तसेच भूजल पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय केवळ एका तालुक्याचा प्रश्न नसून चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
डिंभे धरणाचा डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालविला तर बोगद्याची आवश्यकता नाही. आमचा पाण्याला विरोध नाही; मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी धोक्यात आणणाऱ्या चुकीच्या पद्धतीच्या बोगद्याला ठाम विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी घाईघाईने रस्त्यावर उतरू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांचा वेळ द्यावा.
ते या प्रश्नातून मार्ग काढतील, असा विश्वास वळसे पाटील यांनी व्यक्त केला. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोगदा न करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मंगळवार, दि. १ रोजी निवेदन देताना त्यांना या आश्वासनाची आठवण करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
“डिंभे-माणिकडोह बोगदा हा चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. पाण्याला आमचा विरोध नाही; मात्र चुकीच्या पद्धतीने बोगदा करून शेतकऱ्यांचे पाणी धोक्यात आणण्यास आमचा ठाम विरोध आहे.
– दिलीप वळसे-पाटील






