Pune District : सोमेश्वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान
Pune District : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी झाल्या. विद्यमान अध्यक्ष जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जाहीर झालेली उमेदवारी नाकारत भाजपसोबत स्वतंत्र पॅनल तयार करीत सोयरीक जुळवली.

पुणे : महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस दर देणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची झाली आहे. १२ वर्षांपासून अध्यक्षपदाची एकहाती सुत्रे हाती असलेले विश्वासू शिलेदार पुरूषोत्तम जगताप यांनी बंडाचे निशान फडकावत प्रस्थापित राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) यांच्या पॅनलसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, ही लढाई सहजासहजी सोपी नसून जगताप यांच्यापुढे आव्हाने आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गटांकडून जगताप हे टीकेच्या रडारवर आहेत. त्यासाठी अजित पवार गटाने रणनिती आखली आहेत. तिरंगी लढतीत सूज्ञ सभासद जुन्या पायवाटेवरून जाणार की परिवर्तनाला साथ देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी झाल्या. विद्यमान अध्यक्ष जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जाहीर झालेली उमेदवारी नाकारत भाजपसोबत स्वतंत्र पॅनल तयार करीत सोयरीक जुळवली. शेवटच्या क्षणी हा राजकीय पट उलगडला तरी यामागे सहा महिन्यांपूर्वीची रणनिती असल्याची चर्चा आहे. जगताप यांनी बंड केल्याने सभासदांना आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादीने शिवसेना (शिंदे गट) ला एक जागा देत सोबत घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही निवडणूक लढवित आहे.
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या सहकार्याने स्वतंत्र पॅनल केले. यावेळी जगताप यांच्याबरोबर पुरंदरचे भाजपचे माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे सुदाम इंगळे, शरद पवार गटाचे नेते माणिकराव झेंडे, कार्यक्षेत्रातील संचालक आहेत. जगताप यांनी राष्ट्रवादीविरोधात तगडे आव्हान उभे केले तरी संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. जगताप यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे.
मुरूम- वाल्हा गटात हायव्होल्टेज लढती
मुरुम-वाल्हा गटात तिरंगी लढत होत आहेत. बंडखोर नेते पुरुषोत्तम जगताप (वाणेवाडी), सतीश सकुंडे (वाघळवाडी), वैभव गायकवाड (करंजेपूल) हे नशिब अजमावत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पॅनलकडून विक्रम भोसले (वाणेवाडी), ऋषिकेश गायकवाड (करंजेपूल), राजवर्धन शिंदे (मुरुम), राजेंद्रकुमार जगताप (वाणेवाडी), प्रवीण भोसले (वाणेवाडी), संदीप चव्हाण (मुरूम) यांच्यात तिरंगी हायव्होल्टेज लढती होत आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जगतापांच्या बंडखोरीचे सभासदांना शल्य
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष, अजित पवार यांचे निष्ठावंत शिलेदार पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभा केले. याबाबत राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून जगताप हे टार्गेटवर आहेत. त्यातच जगताप यांच्या बंडामुळे सभासदांना शल्य आहे. हे शल्य मतपेटीतून कोणत्या रुपात उमटणार याकडे पुणे आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मतविभाजन कोणाच्या पथ्थ्यावर?
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढती होत आहेत. त्यात एकसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट पडल्याने मतांची विभागणी होणार आहे. शरद पवार गट एकला चलो रेच्या भूमिकेतून मैदानातून उतरला आहे. बारामती, पुरंदर, खंडाळा कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वरच्या आखाड्यात सूज्ञ सभासद कोणत्या बाजूने झुकणार, मतविभाजन कोणाच्या पथ्थ्यावर पडणार, याची चर्चा झडत आहे. राष्ट्रवादी- शिवसेनेकडून आजी- माजी ११ जण पुन्हा रिंगणात आहेत. पुरुषोत्तम जगताप-भाजप पॅनलकडून सहा आजी-माजी मैदानात उतरले आहेत.
अजितदादांच्या निधनाची सहानुभूती
सोमेश्वर कारखान्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व होते. विद्यमान अध्यक्ष जगताप यांना संधी दिली. एक दशकांहून अधिक काळ ते पदावर होते. महाराष्ट्रात सर्वाधिक दर देण्याचा इतिहास जगताप यांच्या नावावर आहे. इतका कालखंड अध्यक्षपद उपभोगूनही जगताप यांनी वेगळी चूल मांडली. त्यातच अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे सभासदांची सहानुभूती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मिळणार काय, असा सूर कार्यक्षेत्रात दिसून येत आहे.





