Shirur : शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग? दोन शेतकऱ्यांचे नुकसान
Shirur : माहिती मिळताच दुर्गे आणि त्यांचे भाऊ शेतात पोहोचले. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या आगीत दिलीप दुर्गे यांच्या गट क्रमांक ७४९ मधील तसेच त्यांचे भाऊ सुरेश दुर्गे यांच्या शेतातील ऊसाचे नुकसान झाले.

न्हावरे : शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेल्या ऊसाची डोळ्यादेखत राख रांगोळी होत आहे. शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे शॉर्टसर्किट मुळे सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला होता. त्यानंतर आता निमोणे येथे शॉर्टसर्किट होऊन पुन्हा ऊस जळून खाक झाला आहे.
बुधवार, दि २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. निमोणे येथील शेतकरी दिलीप आनंदा दुर्गे (वय ५५) यांच्या ऊसाच्या पिकाला आग लागल्याची माहिती गावातील प्रवीण बाबुराव दोरगे यांनी त्यांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच दुर्गे आणि त्यांचे भाऊ शेतात पोहोचले. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या आगीत दिलीप दुर्गे यांच्या गट क्रमांक ७४९ मधील तसेच त्यांचे भाऊ सुरेश दुर्गे यांच्या शेतातील ऊसाचे नुकसान झाले.
विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचा संशय
दिलीप दुर्गे आणि सुरेश दुर्गे यांच्या शेतातून विद्युत वाहिन्या गेल्या असून, घटनास्थळी विद्युत तारा एकमेकांना चिकटलेल्या दिसून आल्याचे दिलीप दुर्गे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ऊस हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक असल्याने अशा घटनांमुळे वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे आगीचे कारण निश्चित करुन प्रत्यक्ष नुकसानीचा पंचनामा करणे आणि संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळवून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणी दिलीप आनंदा दुर्गे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करत आहेत. आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.





