Alandi News : आळंदीला विकासाचे आदर्श रूप देणार : आमदार लांडगे
Alandi News : शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

आळंदी : आळंदीकरांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवून स्वच्छ, सुबक आणि विकसित आळंदी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र आळंदीत ज्ञानपीठाची पायाभरणी होत आहे. नव्या पदाधिकार्यांच्या कार्यकाळात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ही पुण्यभूमी विकासाचे आदर्श रूप ठरेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्र परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनियुक्त लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्यांची आढावा बैठक आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडली. शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. नियमित व सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी विशेष नियोजन, शहर स्वच्छतेसाठी सक्षम व्यवस्था उभारणे, बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती, सांडपाणी वाहिन्यांबाबतच्या तक्रारींचे त्वरित निवारण तसेच खराब रस्त्यांची डागडुजी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. प्रलंबित विकास प्रस्तावांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
आळंदी शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व प्रकाशयोजना या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करून प्रशासन अधिक जबाबदार व कार्यक्षम बनवण्यावर भर दिला जाईल. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या आळंदीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे.
-प्रशांत कुर्हाडे, नगराध्यक्ष





