शिक्रापूर, (वार्ताहर)– मुखई (ता. शिरुर) येथील शाळेमध्ये शालेय मुलांची ने- आण करणारा बसचालक मुलांना बसमधून शाळेत घेऊन जात नसल्याने बस चालकाला मारहाण करण्यात आली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मधुकर रणपिसे (रा. इकोग्राम सोसायटी, शिक्रापूर), असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. मुखई येथील शाळेमध्ये सविता रणपिसे व नवनाथ रणपिसे या दाम्पत्यांची मुले आहेत. शाळेत पप्पू गिलबिले हे त्यांच्या बसमधून मुलांची ने आण करतात. मात्र रणपिसे यांनी दोन महिन्यांपासून बस भाडे दिले नसल्याने गिलबिले त्यांच्या मुलांना बसमधून नेत नसल्याने रणपिसे दाम्पत्यांनी शाळेजवळ गिलबिले यांना थांबवले. आमच्या मुलांना बसमधून का नेत नाही असे विचारले असता तुमच्या मुलांची दोन महिन्यांची फी जमा करा असे गिलबिले म्हटले असता नवनाथ याने लाकडी काठीने गिलबिले यांना मारहाण करीत जखमी करुन शिवीगाळ, दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पप्पू नामदेव गिलबिले (रा. कोयाळी पुनर्वसन, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करीत आहेत.