खासगी संस्थेला जागा देण्यात सत्ताधाऱ्यांची मान्यता; विरोधात असलेल्या बहुतांश नगरसेवकांची मूकसंमती
चापेकर स्मारक समितीच्या गरुकुलमसाठी ३७ एकर जागा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि.२०) तब्बल २५८ एकर जागेच्या आरक्षण फेरबदलास सत्ताधारी भाजपने मान्यता दिली. मोशीतील या जागेतील रिक्रिएशनल कॉम्प्लेक्स, जलाशयाचे आरक्षण रद्द होणार आहे.
तसेच, आरक्षण फेरबदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोल्फ कोर्स क्लबसाठी १५१ एकर, एमआयएम संस्थेसाठी ७० एकर आणि चापेकर स्मारक समितीच्या आदिवासी गुरुकुलमसाठी ३७ एकर जागा आरक्षित करण्यात आली. त्याला विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बहुतांशी नगरसेवकांनी मूकसमंती दिली.
महापौर रवि लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेतील सर्वाधिक लक्षवेधी विषयांपैकी एक म्हणजे मोशी येथील ३७ एकर जागा एका खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव होता.
मोशी येथील गट क्रमांक ३२७ (जुना गट क्र. ३२५) मधील १५ हेक्टर अर्थात सुमारे ३७ एकर जागेवर मंजूर विकास योजनेत (डीपी) आरक्षण क्रमांक १/२१० अन्वये रिक्रिएशनल कॉम्प्लेक्स (मनोरंजन संकुल) आणि जलाशय हे आरक्षण रद्द करून ही जागा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आदिवासी आश्रम शाळा, चिंचवड या संस्थेच्या निवासी शैक्षणिक संकुलासाठी आरक्षित करण्यास मान्यता देण्यात आली.
शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी मोशी परिसरात तब्बल ६१.३८ हेक्टर (१५१ एकर) जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्स क्लब उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या तहकूब सभपुढे होता. विविध प्रयोजनांसाठी असलेली एकूण दहा आरक्षणे रद्द करून त्या जागेवर गोल्फ कोर्स क्लबसाठी आरक्षण टाकण्यास सभेत मान्यता देण्यात आली.
गोल्फ क्लब आणि गुरुकुलमसाठी आरक्षण फेरबदल करण्यास विरोध झाला होता. मात्र, सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी या विषयांचे समर्थन केले. तर, सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी व शिवसेनेच्या बहुतांशी नगरसेवकांनी या प्रस्तावाला मुकसंमती दिल्याचे पाहायला मिळाले.
आयआयएम संस्थेचे सर्वपक्षीयांकडून स्वागत
शहरात भारतीय व्यवस्थापन संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) स्थापन केली जाणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ७० एकर जागा मोशी येथे देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील मोशीतील रिक्रिएशनल कॉम्प्लेक्सचे आरक्षण रद्द करून त्या ही जागा सार्वजनिक व निमसार्वजनिक वापरासाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास सभेत मान्यता देण्यात आली. आयआयएम संस्थेच्या प्रस्तावाचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले.
दोन-पाच हजार लोकांसाठी गोल्फ क्लब: वाघेरे
चापेकर स्मारक समितीला ही जमीन दिली जाईल. त्यांचे काम चांगले आहे. परंतु, त्यांना इतकी जमीन न देता ५-६ एकर जमीन द्या. बाकीची पालिकेने विकसित करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, मोशीतील अनेक आरक्षणाची जागा वेगवेगळ्या गोष्टींना दिली जात आहे. गोल्फ क्लबसाठी पण जागा देतोय. गोल्फ किती जण खेळतात. दोन-पाच हजार लोकांसाठी एवढी मोठी आरक्षित जागा गोल्फ क्लबला न देण्याची मागणी त्यांनी केली.





