Pimpri Chinchwad Traffic Update : बकरी ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; २७ ते २९ मे दरम्यान ‘या’ मार्गांवर बंदी..जाणून घ्या पर्यायी मार्ग
Pimpri Chinchwad Traffic Update : बकरी ईद सणामुळे २७ ते २९ मे दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीचे नवे नियम; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश.

Pimpri Chinchwad Traffic Update – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारीपासून (दि. २७ मे) तीन दिवस पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. चिंचवडमधील चाफेकर चौक ईदगाह मैदान आणि नेहरूनगरमधील हॉकी स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे रस्ते तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी केले आहे. विशेषतः चिंचवडमधील मोरया नगर, मरीआई माता मंदिर परिसर तसेच नेहरूनगर आणि हॉकी स्टेडियम चौक परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त, बॅरिकेडिंग आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चिंचवड वाहतूक विभागात २७ मे रोजी मोठे बदल
चाफेकर चौक येथील ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे बुधवार, २७ मे रोजी सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काही मार्ग बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
बंद राहणारे प्रमुख मार्ग:
पिंपरी-चिंचवड शहरात बकरी ईदनिमित्त नमाज पठणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, निगडी वाहतूक विभागाने २७ मे २०२६ रोजी काही महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदल लागू केले आहेत. सकाळी ५ ते सायंकाळी ५ या वेळेत मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक, चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर आणि मोरया नगर ते चाफेकर चौक हे मार्ग वाहनांसाठी बंद राहणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले असून, या काळात अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र सूट देण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग:
वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांचीही सोय केली असून, वाहनचालकांनी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बंद असलेल्या मार्गांवरील वाहतूक एसकेएफ कंपनीमार्गे अहिंसा चौक, सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्ग आणि हनुमान मंदिर परिसरातील अंतर्गत रस्त्यांकडे वळविण्यात येणार आहे.
भोसरी-चिखली परिसरात २८ ते २९ मेदरम्यान प्रवेशबंदी
एमआयडीसी भोसरीतील हॉकी स्टेडियम चौकाजवळ तात्पुरता कत्तलखाना उभारण्यात आला आहे. येथे जनावरांची खरेदी-विक्री आणि नागरिकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे २८ मे सकाळी ६ वाजल्यापासून २९ मे रात्री ९ वाजेपर्यंत हॉकी स्टेडियम चौक ते गुलाब पुष्प उद्यान चौक हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. शासकीय, अत्यावश्यक सेवा आणि कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.






