Pimpri Chinchwad Mahotsav: पिंपरी-चिंचवडकरांसाठी पर्वणी! ‘पिंपरी-चिंचवड महोत्सवा’चे भव्य आयोजन; जाणून घ्या काय आहे खास?
Pimpri Chinchwad Mahotsav: व्यावसायिक नाटकं, कवी संमेलन, पाककला स्पर्धा अन् फॅशन शो; सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल.

Pimpri Chinchwad Mahotsav – पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शहराच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली. महोत्सवाच्या आयोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महोत्सवाच्या स्वरूपाची व नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली.
महोत्सवात सर्व वयोगटांतील नागरिकांचा सहभाग राहील, अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. नाट्यरसिकांसाठी दर्जेदार व लोकप्रिय व्यावसायिक मराठी नाटकांचे विशेष प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायक-कलाकारांच्या सहभागातून भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत तसेच लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांचा समावेश असलेली संगीत मैफल आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक लावणीचे सादरीकरण, तरुणाईसाठी आधुनिक संगीत आणि फ्यूजनचा समावेश असलेला रॉक बँड परफॉर्मन्स तसेच विविध सामाजिक विषय, हास्य-विनोद आणि समकालीन आशय मांडणाऱ्या नामवंत कवींचे राज्यस्तरीय कवी संमेलन हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. महिलांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी पाककला स्पर्धा आणि फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या लाठी-काठी, दांडपट्टा व अन्य मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालणाऱ्या या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात शहरातील नागरिक, कलाप्रेमी, महिला, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी गौरव
पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या तसेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा महोत्सवादरम्यान विशेष गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये कलारत्न, साहित्यरत्न, क्रीडारत्न, नृत्यरत्न आणि संगीतरत्न या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून शहरातील गुणवंतांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याचा महोत्सव समितीचा प्रयत्न आहे.






