Pavana Dam Water Level : पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त ४४% पाणी; शहरावर पाणी कपातीचे संकट
Pavana Dam Water Level : पवना धरणातील पाणीसाठा ४४.९२ टक्क्यांवर; वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.

Pavana Dam Water Level – मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात केवळ ४४.९२ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे आणि पावसाच्या लांबणीच्या शक्यतेमुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाने पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांना पाणी वापरामध्ये १५ टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
मावळ पट्ट्यात मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी, पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिलच्या सुरुवातीला सुमारे ४७ टक्क्यांवर असलेला साठा अवघ्या काही दिवसांत ४४ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत पवना धरणात सुमारे ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आणि पावसाचे अनिश्चित चित्र लक्षात घेता साठा टिकवणे मोठे आव्हान ठरत आहे. हवामान खात्याने यंदा मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने पाणी नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षी पवना धरणातील पाण्याचे नियोजन साधारणपणे ३१ जुलैपर्यंत केले जाते.
मात्र यंदाच्या परिस्थितीत उपलब्ध साठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून पाणी वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पवना धरणावर पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील ग्रामीण भाग, शेती आणि औद्योगिक पट्टा मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
पाण्याच्या उपलब्धतेवरच या भागातील दैनंदिन जीवन, शेती आणि उद्योगधंद्यांचे नियोजन अवलंबून असल्याने साठ्यातील घट ही चिंतेची बाब मानली जात आहे. एकूणच, पवना धरणातील घटता पाणीसाठा ही आगामी काळात गंभीर समस्या ठरण्याची चिन्हे आहेत. मान्सून वेळेवर न आल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असून, प्रशासनासोबतच नागरिकांनीही पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यक ठरत आहे.
“पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आणि धरणातील घटता साठा पाहता, दोन्ही महानगरपालिकांना १५ टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आता अनिवार्य आहे.”
– रजनीश बारीया, अभियंता, पवना धरण पाटबंधारे विभाग






