Navratri festival : कार्ला गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ; पहिल्या माळेला रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Navratri festival : दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

कार्ला – महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आणि कोळी-आगरी समाजाची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. ११) घटस्थापनेने प्रारंभ झाला. पहिल्याच माळेला रविवारची सुटी असल्याने पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण गड परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
देवीचा विधिवत अभिषेक झाल्यानंतर सकाळी सव्वासात वाजता श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिपाली हुलावळे, सचिव नवनाथ देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सहखजिनदार विकास पडवळ, विश्वस्त अर्चना देवकर, जितेंद्र बोत्रे तसेच पुजारी आणि गुरव बंधू यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीची आरती झाली. हा सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात भाविक उपस्थित होते.
नवरात्रोत्सवात राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सुविधेसाठी देवस्थान ट्रस्टने विविध व्यवस्था केल्या आहेत. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यावर भर देण्यात आला आहे. मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार असून, दुर्गाष्टमी आणि महानवमीला २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल, अशी माहिती अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली.
गडावरील पायऱ्यांवर रात्री आणि पहाटेच्या वेळी पुरेसा प्रकाश राहावा, यासाठी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगेत बसण्यासाठी बाकडे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवासाठी भाविकांसह वाहने येण्याची शक्यता लक्षात घेऊन पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. गडावरील पार्किंग, रस्त्याच्या कडेला एका बाजूला, तलावाजवळील दुकानांच्या मागील बाजूस तसेच मोठ्या वाहनांसाठी कार्ला फाटा येथील महाराज अग्रसेन पॅलेस परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्ला फाटा ते मंदिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भूषण माने, विजया म्हेत्रे आणि प्रकाश वाघमारे यांनी गड परिसराची पाहणी केली. तसेच कार्ला फाटा ते गडाच्या पायथ्यापर्यंत वाहनतळासाठी उपलब्ध जागांची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.
वेहरगाव पायथा मंदिरातही घटस्थापना
वेहरगाव येथील आई एकवीरा देवीच्या पायथा मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, प्रसिद्ध गाडामालक सुरेश गायकवाड, संदिप देवकर, संतोष देवकर, रमेश पडवळ, अरुण पवार, विकास केणी, शत्रुघ्न देवकर, तेजस खिरे आणि राजु गायकवाड यांच्या हस्ते हा विधी पार पडला. घटस्थापनेनंतर पायथा मंदिरात नऊ दिवसांत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.





