अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; २५० मिळकतींवर कारवाई!
सिटी प्राईड, चिखली-तळवडेतील अतिक्रमण हटविले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई केली. अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लोकमान्य टिळक रस्त्यावरील सिटी प्राईड या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग व तळमजल्यावरील सुमारे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत पत्राशेड व बांधकाम निष्कासित करण्यात आले.
तर फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली आणि तळवडे परिसरातील टॉवर लाईन रस्त्यावरील सुमारे २५० मिळकतींवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत एकूण सुमारे १६ हजार ५०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
लोकमान्य टिळक रस्त्यावरील सिटी प्राईड या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग आणि तळमजल्यावर अनधिकृत पत्राशेड व बांधकाम करण्यात आले होते. याप्रकरणी महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. नोटिशीची मुदत संपल्यानंतरही संबंधित बांधकामधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि. २७) निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
यामध्ये सुमारे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. या कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २० जवान, नऊ मजूर आणि जेसीबी ब्रेकरचा वापर करण्यात आला.
दरम्यान, फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील दक्षिण चिखली भाग आणि प्रभाग क्रमांक १२ मधील तळवडे परिसरातील टॉवर लाईन रस्त्यावरही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील टॉवर लाईन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, दुकानांसमोरील वाढीव ओटे आणि इतर अतिक्रमणे करण्यात आली होती.
ही बांधकामे धोकादायक पद्धतीने उभारण्यात आल्याने महापालिकेने कारवाई केली. या मोहिमेत सुमारे १.८ किलोमीटर रस्त्यावरील २५० मिळकतींवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. यातून सुमारे १६ हजार ५०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. कारवाईसाठी तीन जेसीबी, एक ट्रॅक्टर ब्रेकर, १० कंत्राटी मजूर, महापालिकेचे चार मजूर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २६ जवान तैनात करण्यात आले होते. तसेच अतिक्रमण पोलीस दलाचे पाच कर्मचारी उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सिटी प्राईड येथील कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.
यावेळी उपअभियंता सुशीलकुमार लवटे, बिट निरीक्षक राहुल निकम, सुहास भगत उपस्थित होते. टॉवर लाईन रस्त्यावरील कारवाई अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार आणि फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी उपअभियंता हेमंत घोड, बिट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल्ल भोकरे, ऐश्वर्या मासाळ आणि सूरज माने आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संभाजीनगर, कामगारनगरमध्येही पत्राशेडवर कारवाई
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत शुक्रवारी (दि. २७) संभाजीनगर आणि पिंपरीतील कामगारनगर परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक १० मधील थरमॅक्स चौक ते कस्तुरी मार्केट परिसरातील एकूण २४ अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील कामगारनगर परिसरातही अनधिकृत पत्राशेड हटविण्यात आले. या कारवाईत फुटपाथ मोकळे करण्यात आले. मोहिमेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १४ जवान, महापालिकेचे चार कर्मचारी, चार बीट निरीक्षक, तीन वाहनचालक आणि दोन कॅमेरामन सहभागी झाले होते.





