Crime News: दोन वर्षांत ४१० पिस्तूल, ६६४ काडतुसे जप्त; भाईगिरी करणाऱ्यांना कायद्याचा हिसका
२,१५६ आरोपींना अटक, कोयता गँग आणि गावठी कट्टे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची आक्रमक मोहीम;

पिंपरी– हातात कोयता, कमरेला गावठी कट्टा आणि रस्त्यावर दहशत निर्माण करून भाईगिरी करणाऱ्यांची आता खैर नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या अशा गुन्हेगारांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
अवैध शस्त्रे बाळगणारे, त्यांची वाहतूक करणारे आणि त्यांचा वापर करून दहशत माजवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल ४१० पिस्तूल, ६६४ जिवंत काडतुसे आणि १ हजार ४६५ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईत २ हजार १५६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शहरात काही गुन्हेगारांकडून कोयते आणि गावठी कट्ट्यांचा वापर करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. किरकोळ वादातून शस्त्रे बाहेर काढणे, टोळक्याने रस्त्यावर दहशत माजवणे आणि नागरिकांना धमकावण्याचे प्रकार पोलिसांसमोर आव्हान निर्माण करत आहेत.
अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. संशयितांची तपासणी, शस्त्रांची वाहतूक करणाऱ्यांवर नजर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर कारवाई
अवैध पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सन २०२५ मध्ये आर्मस् ॲक्ट ३(२५) अंतर्गत २०५ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत २४३ पिस्तूल आणि ३९५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच २५३ आरोपींना अटक करण्यात आली.
सन २०२६ मध्ये २७ नोव्हेंबरपर्यंत १३४ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये १६७ पिस्तूल आणि २६९ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी २०८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गावठी कट्ट्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी थेट कायद्याच्या कचाट्यात पकडले आहे.
कोयता गँगची दहशत मोडीत काढण्यावर भर
रस्त्यावर कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या टोळक्यांविरोधातही पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. आर्मस् ॲक्ट ४(२५) अंतर्गत सन २०२५ मध्ये ७५१ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ९०८ कोयते आणि अन्य धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.
तब्बल १ हजार ६६ आरोपींना अटक करण्यात आली. सन २०२६ मध्ये २७ नोव्हेंबरपर्यंत ४३८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या कारवाईत ५५७ कोयते आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. तसेच ६२९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
दोन वर्षांतील कारवाईचा धडाका
सन २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांतील कारवाईचा आढावा घेतल्यास पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी मोहीम राबवल्याचे स्पष्ट होते. या कालावधीत एकूण १ हजार ५२८ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३३९ गुन्हे अवैध अग्निशस्त्रांशी संबंधित आहेत.
तर १ हजार १८९ गुन्हे धारदार शस्त्रांशी संबंधित आहेत.या कारवाईत ४१० पिस्तूल, ६६४ जिवंत काडतुसे आणि १ हजार ४६५ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. एकूण २ हजार १५६ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये अग्निशस्त्रांच्या गुन्ह्यांतील ४६१, तर धारदार शस्त्रांच्या गुन्ह्यांतील १ हजार ६९५ आरोपींचा समावेश आहे.
गुन्हेगारांना स्पष्ट इशारा
शहरात शस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्यांना कोणतीही मोकळीक दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याचा सामना करावा लागणार आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे.
ही शस्त्रे समाजात राहिली असती तर…
पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिस्तूल आणि धारदार शस्त्र जप्त केली. मात्र ही शस्त्र पोलिसांनी जप्त केली नसती तर स्ट्रीट क्राइममध्ये मोठी वाढ झाली आहे. यातून पोलिसांची डोकेदुखी तर वाढलीच असती. याशिवाय समाजात मोठी दहशतही निर्माण झाली असती.





