तुम्हालाही आला असेल असा मेसेज तर सावध रहा

पुणे : तुमचे महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज ठराविक वेळेस तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा , असे बनावट एसएमएस वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत असून त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तुम्हालाही असा कोणताही “एसएमएस’ व व्हॉट्स ऍप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीज ही दैनंदिन वापराचा अविभाज्य घटक असल्याने अशा प्रकरचे मेसेज आल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय आहे प्रकार….
महावितरणच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्यांकडून वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला वीज बील थकल्याचे मेसेज पाठविण्यात येतात. त्यात, बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात येते. त्यामुळे आपली वीज जोडणी बंद होणार या भितीने या लिंकवर क्लीक करून पैसे भरले जातात. त्यामुळे, अशी लिंक क्लीक केल्यास तुमचे बॅक खात्याची डिटेल संबधितांकडे जाऊन तुमचे खाते रिकामे होण्याचा धोका आहे.
महावितरण काय म्हणते…
महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा एमएसईडीसीएल (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही. तसेच महावितरणचे मेसेज पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.





