गुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला
पुणे,दि.17- दुचाकीस्वार संगणक अभियंत्याची लॅपटॉप, मोबाइल तसेच रोकड ठेवलेली पिशवी प्रवासादरम्यान गहाळ झाली होती. गुन्हे शाखेने तत्परतेने तपास करून ही पिशवी अर्ध्या तासात परत केली.
पोलिसांना दाखविलेल्या तत्परतेचे संगणक अभियंता शत्रुघ्न रॉय (वय ,रा. गंगा पॅरेडाईज, वाघोली) गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथकाचे आभार मानले. रॉय मूळचे झारखंडचे आहेत, बालेवाडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत ते काम करतात. ते मंगळवारी समाळी दुचाकीवरून बालेवाडीलाकडे जात होते. दरम्यान शिवाजीनगर भागात दुचाकीला लावलेली पिशवी गहाळ झाली. पिशवीत लॅपटॉप, रोकड, डेबिट, क्रेडीट कार्ड असा मुद्देमाल होता. प्रवासादरम्यान पिशवी गहाळ झाल्यानंतर रॉय यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकातील पोलीस कर्मचारी सचिन ढवळे यांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात रॉय यांची गहाळ झालेली पिशवी शिवाजीनगर भागात असल्याचे समजले. त्यानंतर पोलीसांनी पिशवी शोधून काढली. रॉय यांना अध्रया तासात गहाळ झालेली पिशवी सापडल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि पथकाने ही कामागिरी केली.