Gurnoor Brar : IPL मध्ये 30 लाखांची बोली, आता थेट भारतीय संघात एन्ट्री! कोण आहे गुरनूर ब्रार?
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारच्या (Gurnoor Brar) नावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Gurnoor Brar : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारच्या (Gurnoor Brar) नावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी त्याच्याबद्दल विश्वास व्यक्त करताना म्हटले की, गुरनूर भारतीय क्रिकेटचे भविष्य असू शकतो.
गुरनूर ब्रारने (Gurnoor Brar) एका वृत्त पत्राशी बोलताना आपल्या क्रिकेट प्रवासाबद्दल खुलासा केला. डेल स्टेन, शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांच्या अॅक्शनचे अनुकरण करत गोलंदाजी करण्यात त्याला विशेष रस होता.
“मी डेल स्टेनचा मोठा चाहता आहे. त्याच्यामुळेच मी गोलंदाजी करू लागलो. त्याने वेग आणि अचूकता यांचा अद्भुत संगम साधला होता. दशकभराहून अधिक काळ त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले,” असे गुरनूरने सांगितले.
वयाच्या १६व्या वर्षी गुरनूरने चारदिवसीय क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली. मात्र त्याची पहिली आवड फुटबॉल आणि टेनिस होती. एका मित्राच्या सांगण्यावरून त्याने शाळेत क्रिकेट ट्रायल्स दिल्या आणि त्याची निवड झाली. सहा फूट पाच इंच उंचीचा फायदा घेत गुरनूरने (Gurnoor Brar) वयोगटातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली.
शुबमन गिलशी मैत्री आणि संधी
याच काळात गुरनूरची शुबमन गिलशी भेट झाली. गुरनूरच्या वेगवान गोलंदाजीने गिलला प्रभावित केले. “U19 दिवसांपासून मी त्याला गोलंदाजी करतो आहे. तो भारतासाठी U19 सामने खेळत असताना कटोच शिल्डसाठी आला होता. त्याने माझी गोलंदाजी पाहिली आणि जिल्हा संघात निवड होण्यासाठी प्रयत्न केले,” असे गुरनूरने आठवण सांगितली. त्यानंतर त्याची पंजाब U23 संघात निवड झाली.
आयपीएल संपल्यानंतर गुरनूर शेर ए पंजाब लीगमध्ये खेळला. मात्र या स्पर्धेदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली. २०२३-२४ हंगामात तो पूर्णपणे बाहेर पडला. “दुखापतीपूर्वी मी वर्कलोड मॅनेजमेंट आणि फिटनेसबाबत गंभीर नव्हतो. पण दुखापतीनंतर त्याचे महत्त्व समजले,” असे त्याने मान्य केले.
गुरनूरचे गाव पंजाबातील श्री मुक्तसार साहिब जिल्ह्यातील खेओ वाली आहे. दुखापतीमुळे आयपीएल कंत्राट मिळाले नाही. त्यावेळी त्याचा जुना मित्र शुबमन गिल पुन्हा मदतीला धावून आला. “शुबमनने विचारले की, काय करतो आहेस? तो म्हणाला, गुजरात टायटन्सकडे नेट बॉलर म्हणून ये. इथे खूप काही शिकायला मिळेल. ते खरोखरच खरे ठरले,” असे गुरनूरने सांगितले. शुबमन गिल संघातील सहकाऱ्यांचा नेहमी विचार करतो, अशी प्रशंसा त्याने केली.
आशिष नेहरा आणि कागिसो रबाडाकडून मार्गदर्शन
गुजरात टायटन्सकडे नेट बॉलर म्हणून सामील झालेल्या गुरनूरला संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांचे मार्गदर्शन मिळाले. अनेक दुखापतींना तोंड देत यशस्वी पुनरागमन केलेल्या नेहरा यांनी गुरनूरला दुखापती टाळण्याचे, रिकव्हरीचे आणि फिटनेसचे महत्त्व पटवून दिले. “ते मला सांगतात की, मी केलेल्या चुका करू नकोस,” असे गुरनूर म्हणाला.
वर्षभर नेट बॉलर म्हणून काम केल्यानंतर गेल्या वर्षी गुजरात टायटन्सने लिलावात ३० लाख रुपयांना गुरनूरला संघात घेतले आणि यंदा त्याला रिटेनही केले. संघातील दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्याकडूनही गुरनूरला मार्गदर्शन मिळते. “रबाडा माझी गोलंदाजी बारकाईने पाहतो, सल्ले देतो आणि दुखापत टाळण्यासाठी काय करावे हे सांगतो,” असे गुरनूरने सांगितले.
डोमेस्टिक कामगिरी
गुरनूर (Gurnoor Brar) पंजाब संघाकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळतो. आतापर्यंत त्याने १८ सामने खेळले आहेत. भारतीय ‘अ’ संघातून त्याने ३ सामन्यात १२ विकेट्स घेतली आहेत.सध्या युवा वेगवान गोलंदाजांच्या नव्या पिढीत गुरनूर ब्रार एक आशादायक नाव म्हणून पुढे येत आहे.






