Scrub typhus : पावसाळ्यात वाढतोय स्क्रब टायफसचा धोका; घाबरू नका, वेळीच घ्या वैद्यकीय सल्ला!
Scrub typhus : गवत आणि झुडपांमधील सूक्ष्म कीटकांच्या चाव्याने संसर्ग

पिंपरी – पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आणि संसर्गजन्य आजार वेगाने डोके वर काढतात. सध्याच्या दमट वातावरणात स्क्रब टायफस या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढू शकतो. या आजाराचे नाव ऐकून घाबरण्याचे मुळीच कारण नाही. योग्य वेळी अचूक निदान आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो.
हा आजार डासांमुळे किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट पसरत नाही. ओरिएंटिया त्सुत्सुगामुशी या जिवाणूमुळे हा संसर्ग होतो. गवत, झुडपे आणि झाडीमध्ये आढळणाऱ्या अतिसूक्ष्म कीटकाची अळी (माइट्स) चावल्याने हा आजार होतो. शेतात काम करणाऱ्या किंवा गवताळ भागात खेळणाऱ्या मुलांना याचा अधिक धोका संभवतो.
शहरात अद्याप या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली नसली तरी ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यात हा आजार उद्भवतोच. त्यासाठी काळझी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
प्रमुख लक्षणे
- सतत येणारा तीव्र ताप आणि डोकेदुखी.
- तीव्र अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे.
- भूक मंदावणे, मळमळ आणि उलट्यांचा त्रास.
- अंगावर बारीक पुरळ उठणे आणि लसिका ग्रंथींना सूज येणे.
- कीटक चावलेल्या जागेवर सिगारेटच्या चटक्यासारखी काळी खपली दिसते.
पालकांनी लहान मुलांबाबत घ्यावयाची खबरदारी
- ताप दीर्घकाळ टिकून राहणे.
- मूल सतत सुस्त किंवा अस्वस्थ दिसणे.
- पाणी, दूध पिणे कमी होणे अथवा लघवीचे प्रमाण घटणे.
- धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा झटके येणे.
- मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.प्रतिबंधात्मक उपाय
- घराभोवती गवत आणि झुडपे वाढू देऊ नका; परिसर स्वच्छ ठेवा.
- बाहेर खेळताना किंवा गवताळ भागात जाताना संपूर्ण शरीर झाकणारे पूर्ण कपडे वापरा.
- बागेतून किंवा बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवा.
- ताप अंगावर काढू नका; परस्पर औषधे न घेता डॉक्टरांकडून वेळेत तपासणी करून घ्या.





