Thailand school : थायलंडमधील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार! किमान ७ ठार, अनेक जण जखमी
तायलंडची राजधानी बँकॉकबाहेरील एका हायस्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात किमान पाच जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.

Thailand school – तायलंडची राजधानी बँकॉकबाहेरील एका हायस्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात किमान पाच जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. या बंदुकधाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बँकॉकच्या वायव्येकडील नॉनथाबुरी प्रांतातील देबसिरिन नॉनथाबुरी शाळेत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात शिक्षक आणि प्रशासकांसह पाच शालेय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असे गृह उपमंत्री पोलापी सुवुंचवी यांनी घटनास्थळी सांगितले.
गोळीबार करणारा १४ वर्षांचा होता आणि त्याने आत्महत्या केली. आपल्या आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या त्या मुलामध्ये शाळेसंबंधी तणावाची लक्षणे दिसून आली होती, असे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी शाळेचा दौरा केल्यानंतर सांगितले. या हल्लेखोर मुलाकडे असलेली बंदूक त्याच्या आजोबांच्या नावावर नोंदणी झालेली होती.
या शाळेमध्ये १२ ते १८ वर्षे वयोगटातील ३ हजार विद्यार्थी आहेत. दुसऱ्या इमारतीतून गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यावर विद्यार्थी एका वर्गात लपले. पोलीस आल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढले, असे एका साक्षीदाराने पत्रकारांना सांगितले. गोळीबारात २३ जण जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
आजी-आजोबांचीही केली होती हत्या
हायस्कूलमधील घटनेनंतर पोलीस संबंधित विद्यार्त्याच्या आजोबांच्या घरी गेले. तेंव्हा घर बंद होते. घराचे दार कोणीच उघडले नाही. अधिकाऱ्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले असता, आजी-आजोबा दोघांचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे आढळून आले.
शाळेतील गोळीबारापूर्वी, हल्लेखोराने आपल्या दोन आजी-आजोबांचीही घरी हत्या केली होती. हा मुलगा सहसा स्वतःच्याच विश्वात रमणारा आणि एक चांगला विद्यार्थी होता, असे त्याच्या अनेक कुटुंबीयांनी सांगितले.





