Shrirampur: सामाजिक बांधिलकी जपत सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रिज प्रा. लि. यांच्या वतीने साखर कामगार हॉस्पिटलला अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील रुग्णांना तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. या रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन सेवेत वेग आणि कार्यक्षमता वाढणार असून गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी हलविणे अधिक सुलभ होणार आहे, असा विश्वास हॉस्पिटल प्रशासनाने व्यक्त केला. या कार्यक्रमास कंपनीचे प्लांट हेड विजय गजभिये, क्वालिटी हेड जुबेर अली खान, मानव संसाधन विभागाचे ललित घोडके, संजय पटेल, बाळासाहेब खरात, मंगेश यादव व रामअशिश यादव उपस्थित होते. तसेच साखर कामगार हॉस्पिटल ट्रस्टचे सचिव अविनाश आपटे, विश्वस्त ज्ञानदेव आहेर, वैद्यकीय संचालक डॉ. रवींद्र जगधने, डॉ. शरद सातपुते, आपटे काका, श्रीरामपूर मराठी संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप आहेर, चित्रकार रवी भागवत आणि आकाशवाणीचे निवेदक संतोष मते यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. कंपनीच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या उपक्रमाबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रिजचे आभार मानले असून परिसरातील नागरिकांसाठी ही रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.