Railway Accident : घाईघाईत रेल्वे पटरी ओलांडत असलेल्या एका ४८ वर्षीय महिलेला रेल्वेची जोरदार धडक बसली. या घटनेत महिला जागीच ठार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ शिवारात दि. ४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. अनिता लक्ष्मण लाहुंडे (वय ४८, रा. टाकळीमियाॅ, ता. राहुरी) या शेत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान अनिता लाहूंडे शेत मजुरीसाठी मुसळवाडी येथे घाईघाईत जात होत्या. दरम्यान, टाकळीमियॉ ते मुसळवाडी रस्त्यावरील बोगद्याजवळ अनिता लाहुंडे रेल्वे पटरी ओलांडत होत्या. त्यावेळी त्यांना दौंडकडून मनमाडकडे जाणाऱ्या मालवाहतूक गाडीची जोरदार धडक बसली. या धडकेत त्यांना जबरदस्त मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अनिता लाहुंडे यांच्या पतीचे सुमारे १५ दिवसांपूर्वीच निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, जावई असा परिवार आहे.