Accident : कर्जतमध्ये अपघातांची मालिका सुरूच; भरधाव कारच्या धडकेत 11 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
Accident : मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आर्या ठोंबरे हिच्या मृत्यूने परिसरात शोककळा.

Accident : मुरबाड–कर्जत राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी भीषण अपघात होऊन इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आर्या अनिल ठोंबरे (वय ११, रा. कुंडलज) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती भोईरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती.
सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर आर्या नेहमीप्रमाणे पायी घरी जात होती. यावेळी महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कर्जतचे गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. आर्याच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. या घटनेमुळे कुंडलज आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
महामार्गावरील भरधाव आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पाप मुलीचा जीव गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





