अग्रलेख : साखरेची चव कडू
सणासुदीमध्ये साखरेच्या दराने उच्चांक गाठला आहे. अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये पन्नास रुपये किलो असणारी साखर (Sugar) 75 रुपये किलो दरापर्यंत पोहोचली आहे.

Sugar : सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील घराघरांमध्ये दररोजच्या दिवसाची कहाणी मोठ्या आनंदाने वाचली जात असतानाच दुसरीकडे महागाईची कडू कहाणीसुद्धा सुरू झाली आहे. सणासुदीमध्ये साखरेच्या दराने उच्चांक गाठला आहे. अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये पन्नास रुपये किलो असणारी साखर (Sugar) 75 रुपये किलो दरापर्यंत पोहोचली आहे.
एवढेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या भाज्या, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूसुद्धा महाग झाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरील आर्थिक भार वाढत असताना त्यातच आता हा महागाईचा बोजाही वाढू लागल्याने दैनंदिन आर्थिक वेळापत्रक कसे सांभाळायचे याचे आव्हान (Sugar) सर्वांनाच पेलावे लागत आहे.
विशेषतः साखरेच्या दरामधील वाढ अचानक का झाली आहे याची चौकशी होण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वीच यावर्षी जीवनावश्यक वस्तू आणि शेतीमालाच्या वस्तूंची महागाई होईल, असा इशारा दिला असला तरी साखरेची महागाई इतक्या उच्चस्तराला जाईल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. अर्थात, यामागे काही नैसर्गिक कारणेही आहेत आणि कृत्रिम कारणेही आहेत.
सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे यावर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे शेतमाल उत्पादनाला फटका बसणार आहे आणि साखरेच्या उत्पादनाबाबत जो अंदाज केला होता त्यामध्ये मोठी तफावत दिसेल. अशी भीती व्यक्त केल्यामुळेच नफेखोर आणि दलाल यांनी आतापासूनच त्या साखरेची साठेबाजी सुरू केल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.
कोणत्याही उत्पादनाची किंमत ही नेहमी मागणी व पुरवठा या सूत्रावरच अवलंबून असते. अनेक वेळा साठेबाज व दलाल आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करून किंमत वाढवून घेतात. आजपर्यंत साखरेबाबत अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. यावेळी मात्र पुढील वर्षी साखरेच्या उत्पादनात घट होण्याच्या भीतीने आतापासूनच दलालांनी साठेबाजीची तीव्रता वाढवल्याने दर विक्रमी पातळीला पोहोचले.
सरकारने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिल्यामुळे साखर निर्मिती घटली असेही म्हटले जात आहे. सरकारकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. कारण, इथेनॉल निर्मितीसाठी केवळ उसाचा वापर न करता मका आणि काही इतर पिकांचाही वापर केला जातो असा खुलासा सरकारने केला आहे. पण साखरच नाही तर दैनंदिन जीवनातील अन्नाची गरज पूर्ण करणार्या भाज्या आणि फळे यांचेही दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत.
खरे तर श्रावणासारख्या महिन्यामध्ये सांस्कृतिक कारणामुळे कांदा आणि लसूण यासारख्या शेती उत्पादनांचे दर कमी होत असतात. कारण, मागणी कमी झालेली असते. पण यावेळी ऐन श्रावण महिन्यामध्ये कांद्याचे दरही वाढलेले दिसत आहेत. साखर, कांदा यासारख्या मूलभूत शेती उत्पादनांच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा आपोआपच एक किंमतवाढीची साखळी तयार होते.
साखरेच्या (Sugar) दरात ठराविक कालावधीमध्ये 59 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्यानंतर सामान्यांचे आवडते पेय असलेला चहासुद्धा महाग झाला आहे. कमी पैशात पोटाची भूक भागवणार्या कांदाभजीसारखे पदार्थसुद्धा महाग झाले आहेत. साखर आणि भाज्यांच्या दरवाढीमुळे आपोआपच तयार पदार्थांचे दरही वाढल्यामुळे एका वेगळ्याच महागाईला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
आता कुठे भारतीय संस्कृतीतील सण आणि उत्सवाला प्रारंभ झाला आहे. आगामी तीन महिने सण आणि उत्सवांचे असणार आहेत. याच कालावधीमध्ये अशा प्रकारची दरवाढ सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडून टाकणारी ठरली आहे. साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही उपाययोजना करण्यास सुरुवात केली असली तरी साखरेच्या दरवाढीपूर्वीची किंमतपातळी आता गाठली जाईल असे वाटत नाही.
कित्येक वर्षे साखरेचा दर 40 ते 45 रुपये किलो यामध्ये होता. पण आता तो 50च्या खाली येईल अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सरकारने कितीही उपाययोजना केल्या तरी एकूण साखर निर्मितीत झालेली घट आणि वाढलेला साठेबाजपणा यामुळे साखर दराची नियमित पातळी आता 50 ते 55 रुपयांच्या आसपासच राहील अशीच लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आपोआपच इतर पदार्थांच्या महागाईतही वाढ होणे अपरिहार्य आहे.
आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर साखर वापरली जाते. शीतपेय असो किंवा मिठाईसारखे पदार्थ असो किंवा आइस्क्रीमसारखे पदार्थ त्यांच्या निर्मितीसाठी साखर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनात साखर वापराचे प्रमाण तुलनेने कमी असते. पण त्यालाच एकूण साखरेच्या महागाईचा फटका बसतो.
साहजिकच खूप दीर्घकाळ जी मागणी सुरू आहे त्याचा आता सरकारने विचार करून औद्योगिक वापरासाठी जी साखर वापरली जाते त्याचा दर वेगळा निश्चित करून घरगुती वापराच्या साखरेसाठी (Sugar) कमी दर निश्चित करणे गरजेचे झाले आहे. साखरेची चव जरी गोड असली तरी महागाईमुळे तिची चव सर्वसामान्य नागरिकांसाठी कडू झाली आहे. गोड साखरेची ही कडू कहाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी सणासुदीच्या कालावधीमध्ये आता आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरू लागली आहे हे निश्चित.






