अग्रलेख : आता पाणी वाचवाच!
महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाप्रमाणे येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र दहा टक्के पाणीकपात (Water) केली जाणार आहे.

Water : महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाप्रमाणे येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र दहा टक्के पाणीकपात (Water) केली जाणार आहे. राज्यातील ग्रामीण भागाला सध्या दुष्काळाचा तीव्र चटका बसत असतानाच आता राज्य सरकारच्या या निर्णयाप्रमाणे राज्यातील नागरी भागांमध्येही पाणीकपात केली जाणार आहे. हा निर्णय अत्यंत व्यवहारी आणि स्वागतार्ह असाच मानावा लागेल.
कारण राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जेव्हा राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, तेव्हा 75 टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त असल्याचेही सांगण्यात आले होते. राज्यातील मोठमोठी नगरे किंवा महानगरे आहेत, त्यामधील नागरिकांना किंवा काही प्रमाणात तेथील प्रशासनालासुद्धा ग्रामीण भागातील महाराष्ट्र जे काही भोगत आहे त्याची जाणीव नसावी अशा घटना सातत्याने समोर येताना दिसत होत्या.
ग्रामीण भागात सामान्य नागरिकांना शेतीसाठी पाणी (Water) नाही हा तर विषय आहेच, पण या नागरिकांना पिण्यासाठी आणि जनावरांची तहान भागवण्यासाठीसुद्धा पाण्याची टंचाई असताना महानगरांमध्ये गाड्या धुण्यासाठी आणि इतर अनावश्यक कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. त्याच्या कथा समोर येऊ लागल्यानंतर आता अशा प्रकारची पाणीकपात अपरिहार्यच मानावी लागेल.
अर्थात केवळ सरकारने एखादा निर्णय घेतला म्हणून अशाप्रकारे दहा टक्के पाणी वाचवले जात असेल तर महानगरातील नागरिकांमध्ये पाणी वाचवण्याबाबत पुरेशी जागृती झाली नाही असेच म्हणावे लागेल. ‘पाणी वाचवा’ ही केवळ सातत्याने उच्चारावी लागणारी अशी म्हण नसून कृतीमध्ये आणण्याची गोष्ट आहे हे सर्वांच्याच मनावर बिंबवावे लागणार आहे.
मुळात गेल्या अकरा वर्षांमध्ये सर्वात कोरडा हंगाम म्हणून यंदाचा उल्लेख करावा लागेल. यावर्षी मान्सूनमध्ये नैसर्गिक पद्धतीने जे पाणी पृथ्वीवर येते, त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार करता 12% कपात झाली आहे. साहजिकच जे पाणी आता उपलब्ध आहे ते पुढील मान्सूनच्या हंगामापर्यंत कोणत्याही परिस्थितीत पुरवावे लागणार आहे. या उपलब्ध पाण्याचा (Water) वापर कसा करावयाचा याचा निर्णय राज्य सरकारच्या हातात असतोच. पण सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा पाणी वाचवण्यासाठी आपले प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे.
जेवढ्या प्रमाणात राज्यामध्ये शेतीला पाणी लागते तेवढ्याच प्रमाणात ते औद्योगिक कारणासाठीसुद्धा वापरावे लागते. या व्यतिरिक्त माणसांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीसुद्धा पाण्याचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तहान भागवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते आणि ही तहान फक्त माणसाची नसते तर जनावरांची तहान भागवण्याचे कर्तव्यसुद्धा मानवालाच पूर्ण करावे लागते. एकूण परिस्थिती पाहता आता जेवढे काही पाणी उपलब्ध आहे तेवढेच येत्या काही महिन्यांमध्ये वापरावे लागणार आहे.
साहजिकच योग्य प्राधान्यक्रम वापरूनच पाण्याचा उपयोग केला तरच ही परिस्थिती सुसह्य होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा सुयोग्य वापर करत असतानाच पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. साध्या साध्या उपायांची योजना करून पाणी वाचवले जाऊ शकते. सर्वांच्याच घरात नेहमीपेक्षा दहा टक्के पाणी कमी येणार आहे.
म्हणजेच त्यांना उपलब्ध होणारे पाणीच काटकसर करून वापरावे लागणार आहे. पाण्याचा भरमसाठ वापर करणारे जे काही उपक्रम आहेत बंद ठेवून फक्त आवश्यक कामासाठीच पाण्याचा वापर करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं लागणार आहे.
राज्य सरकारला आगामी कालावधीमध्ये टँकरच्या माध्यमातूनही पाणीपुरवठा करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी व्यवस्थित पाणी उपलब्ध आहे तेथील पाणी टंचाईग्रस्त परिसरामध्ये पोहोचवण्यासाठी रेल्वे मार्गाने, रस्ता मार्गाने पाणी न्यावे लागणार आहे. इतकी गंभीर परिस्थिती असताना पाण्याची चैन करणे कोणालाही परवडणारे नाही. वीस रुपये टाकले की पिण्याचे थंडगार पाणी उपलब्ध होऊ शकते हा विचार मनातून बाजूला काढून पाणी कसे वाचवू शकतो या विचाराला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
तिकडे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे, मी इकडे पाणी वाचवून काय करू असा विचार करणे म्हणजे करंटेपणाचे लक्षण मानावे लागेल. कारण आज ज्यांच्याकडे पाण्याची समृद्धी आहे त्यांच्याकडे भविष्यात पाण्याचा दुष्काळ निर्माण होऊ शकतो. साहजिकच आता सरकार जर त्यांच्या पातळीवर पाणी वाचवण्यासाठी विविध उपाय योजना करत असेल तर नागरिकांनी आपल्या पातळीवरसुद्धा गंभीरपणे पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
दररोज पाण्याचे सडे घालून आपले अंगण स्वच्छ करण्याची गरज नाही किंवा दररोज गाड्या धुण्याचीही गरज नाही. आज भरलेले पाणी उद्या शिळे होणार म्हणून ते ओतून परत नव्याने भरणे यासारखे पाप सध्याच्या काळात दुसरे कोणतेही असणार नाही.
पाण्याचा (Water) एक थेंबही अत्यंत किमती असल्याने त्याचे महत्त्व लक्षात घेऊनच सर्व स्तरावर पाणी वाचवण्यासाठी मोहीम उभारावी लागणार आहे. ‘पाणी वाचवा’ हा केवळ एक सुविचार नसून गंभीरपणे कृतीत आणण्याचा विचार आहे हे सिद्ध करून दाखवण्याची हीच वेळ आहे.






