अग्रलेख : पोर्तुगाल आणि रोनाल्डो
फिफा विश्वचषक 2026 मध्ये ‘राउंड ऑफ 16’च्या सामन्यात स्पेनकडून पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले आणि त्यासोबतच पोर्तुगालचा फुटबॉलपटू महानायक ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या पर्वाचाही समारोप झाला.

Cristiano Ronaldo : फिफा विश्वचषक 2026 मध्ये ‘राउंड ऑफ 16’च्या सामन्यात स्पेनकडून पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले आणि त्यासोबतच पोर्तुगालचा फुटबॉलपटू महानायक ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या पर्वाचाही समारोप झाला. या पराभवामुळे डोळ्यांत पाणी असतानाच रोनाल्डोने हा त्याचा अखेरचा विश्वचषक होता हे स्पष्ट केले आहे.
शिवाय पोर्तुगालच्या जर्सीमध्ये आणखी एखाद्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची त्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. एवढ्या मोठ्या खेळाडूच्या करिअरची अखेर जेव्हा अशा पराभवामुळे होते, तेव्हा त्याच्या चाहत्यांना नक्कीच दुःख होते. कारण पोर्तुगालसाठी रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा एक महानायक आहे त्याच्या अंतिम वर्ल्डकप स्पर्धेत त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण सहा फिफा विश्वचषक खेळणार्या रोनाल्डोला त्याच्या कारकिर्दीत एकदाही आपल्या देशाला विजेता बनवता आले नाही ही खंत त्याच्या मनात कायम राहणार आहे.
तरीही पोर्तुगालच्या फुटबॉल विश्वातील दंतकथा बनलेल्या रोनाल्डोचा आदर्श नवीन पिढीतील फुटबॉलपटू घेत राहतील हे निश्चित. कारण पोर्तुगालसारख्या छोट्या देशात एका छोट्या गावातून आलेल्या रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) कारकीर्द निश्चितच प्रेरणादायी आहे. पोर्तुगालमधील मडेरा या छोट्या गावामध्ये रोनाल्डोला योग्य फुटबॉल साधने उपलब्ध नव्हती. आजूबाजूला जे काही उपलब्ध होते, त्याचाच तो वापर करायचा.
प्लॅस्टिकच्या बाटल्या, दगड हे त्यासाठी फुटबॉल होते आणि अरुंद रस्ते हेच त्याचे पहिले सरावाचे मैदान बनले. त्यामुळे चेंडूवरील घट्ट नियंत्रण आणि चपळ पाय विकसित होण्यास मदत झाली. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी गाव सोडून आलेल्या रोनाल्डोला राजधानी लिस्बनमधील जीवनात स्थिरावण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याला घराची तीव्र आठवण येत असे.
पहिल्यांदाच आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने, हा बदल त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप मोठा होता. पण घरी परतण्याऐवजी, त्याने त्या कठीण सुरुवातीच्या महिन्यांचा उपयोग अकादमीच्या सर्वात मेहनती खेळाडूंपैकी एक बनण्यासाठी केला. हीच लवचिकता त्याच्या कारकिर्दीची ओळख बनली. अनेक व्यावसायिक फुटबॉल क्लबकडून खेळताना आणि नंतर पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने निश्चितच लक्षणीय कामगिरी केली. जरी त्याला आपल्या देशाला वर्ल्डकप फुटबॉल जिंकू देता आला नसला तरी त्याच्या परिश्रमाबाबत कोणाला शंका घेता येत नाही.
फुटबॉलसारख्या दमवणार्या खेळामध्ये एवढी दीर्घ कारकीर्द असणे हीच एक आश्चर्याची गोष्ट असते. या स्पर्धेमध्ये पोर्तुगालचे व्यवस्थापन रोनाल्डोवर अतिरेकी अवलंबून राहिल्याचा दोषही देण्यात येत आहे. फिफा विश्वचषकाच्या ‘राउंड ऑफ 16’ मध्ये युरोपियन चॅम्पियन स्पेनविरुद्ध खेळताना, पोर्तुगालने आपल्या चुकांमधून काहीही न शिकण्याचे धोरणच अवलंबले.
स्पर्धेतील त्यांच्या प्रवासात आधीच अनेक अडथळे आले होते, तरीही ‘रोनाल्डो’ या नावाला मिळणार्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे आणि अतिउत्साहाच्या वातावरणामुळे संघ व्यवस्थापनाला काही बदल करण्याची मानसिकताच निर्माण झाली नाही. व्यवस्थापक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्या रणनीतीमधील चुका यावेळी घातक ठरल्या. कारण बाद फेरीत म्हणजे नॉकआउट राउंडमध्ये दुसरी संधी मिळत नाही याचा विसर व्यवस्थापनाला पडला.
या स्पर्धेतील एका आकडेवारीनुसार रोनाल्डो हा मैदानावर सर्वात खराब कामगिरी करणारा पोर्तुगीज खेळाडू ठरला; या स्पर्धेत रोनाल्डोला फक्त तीन गोल करता आले. दुसरीकडे जागतिक फुटबॉल विश्वामध्ये ज्याच्या नावाची नेहमी चर्चा होत असते त्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने या स्पर्धेमध्ये रोनाल्डोच्या तुलनेत अत्यंत लक्षणीय कामगिरी केलेली दिसते.
कदाचित तो या स्पर्धेमध्ये आपल्या देशाला पुन्हा एकदा विजेतेपदाचा मान मिळवून देऊ शकतो. पोर्तुगालला आपल्या रोनाल्डो या महानायकाकडूनही तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा होती. पण रणनीतीतील चुका आणि वैयक्तिक कामगिरीतील मर्यादांमुळे रोनाल्डो आणि पोर्तुगाल या दोघांनाही पराभवाचा धक्का पत्करावा लागला. रोनाल्डोसारख्या मोठ्या खेळाडूचा दबाव आणि प्रभाव नेहमी संघ व्यवस्थापनावर असतो. संघ व्यवस्थापक मार्टिनेझ यांनी गोंसालो रामोस या गुणी खेळाडूला मैदानात उतरवलेच नाही.
काही दिवसांपूर्वीच क्रोएशियाविरुद्धच्या ‘राउंड ऑफ 32’ सामन्यात पोर्तुगालसाठी निर्णायक गोल रामोसनेच केला होता. व्यवस्थापनाचा हा हट्टीपणा चुकीचा ठरला. खरे तर पोर्तुगीज संघाच्या कामगिरीवर रोनाल्डोचा एकूण प्रभाव काही काळापासून नक्कीच मंदावला आहे. रोनाल्डो आता वर्ल्डकप खेळणार नसला तरी आगामी कालावधीमध्ये इतर जागतिक फुटबॉल स्पर्धांमध्ये तो देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे की नाही हासुद्धा चर्चेचा मुद्दा राहणार आहे.
रोनाल्डोचे व्यावसायिक फुटबॉल करिअर सुरूच राहील आणि पोर्तुगालसारख्या छोट्या देशामधून जे गुणवान आणि प्रतिभाशाली फुटबॉलपटू निर्माण होत आहेत त्यांच्यासाठी हा महान खेळाडू नेहमीच आदर्श म्हणून समोर असेल यात शंका नाही.






