Tamilnadu News : राहुल-विजय यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध फोडणार कोंडी? तमिळनाडूत उद्या शपथविधी होण्याचे संकेत
स्वत: विजय यांनी सरकार स्थापनेविषयी विश्वास व्यक्त केला आहे. आता तमिळनाडूचे चित्र येत्या एक ते दोन दिवसांत स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

Tamilnadu News – तमिळनाडूतील सरकार स्थापनेवरून राजकीय कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे ती कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर, विजय यांचा मुख्यमंत्री म्हणून येत्या गुरूवारी (७ मे) शपथविधी होण्याचे संकेतही मिळू लागले आहेत.
यावेळच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल नवा राजकीय इतिहास घडवणारा ठरला. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना चकित करत अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारली. विधानसभेच्या एकूण २३४ पैकी १०८ जागा जिंकत टीव्हीके सर्वांत मोठा पक्ष ठरला.
मात्र, बहुमताचा जादुई आकडा (११८) गाठण्यापासून त्या पक्षाला १० जागा कमी पडल्या. साहजिकच, सरकार स्थापनेसाठी इतरांच्या पाठिंब्यावर त्या पक्षाला विसंबून राहावे लागणार आहे.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रमुख पक्षांना टाळून टीव्हीकेने कमी जागा असणाऱ्या पक्षांपर्यंत पोहचण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती मिळत आहे. त्यादृष्टीने सत्ता गमावलेल्या द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीतील घटक पक्षांचे महत्व वाढले आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचाही समावेश आहे.
यावेळच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ५ जागा जिंकल्या आहेत. तर, इतर लहान पक्षांनी ९ जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या मिळून १४ आमदारांच्या पाठिंब्यावर विजय यांची प्रमुख भिस्त असल्याचे समजते. टीव्हीकेने कॉंग्रेस आणि संबंधित पक्षांना संदेशही पाठवला असल्याचे समजते.
राहुल आणि विजय यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याचे दडून राहिलेले नाही. निवडणूक निकालानंतर राहुल यांनी विजय यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे अभिनंदनही केले. ती घडामोड तमिळनाडूच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे.
स्वत: विजय यांनी सरकार स्थापनेविषयी विश्वास व्यक्त केला आहे. आता तमिळनाडूचे चित्र येत्या एक ते दोन दिवसांत स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.






