Prime Minister Modi : “इंधनांचा वापर काटकसरीने करण्याची गरज” – पंतप्रधान मोदी
इंधनांचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज बनली आहे, असे महत्वपूर्ण भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

Prime Minister Modi – इंधनांचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज बनली आहे, असे महत्वपूर्ण भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. त्यासाठी त्यांनी पश्चिम आशियातील संघर्षाचा संदर्भ दिला.
गॅस, पेट्रोल, डीझेल यांसारखी आयात होणारी पेट्रोलियम उत्पादने गरजेनुसारच वापरली जायला हवीत. त्यामुळे परकी चलनाची बचत तर होईलच.
त्याशिवाय, युद्धाच्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी होईल, असा विश्वास मोदींनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे संपूर्ण जगासमोर विविध समस्या निर्माण झाल्या.
गॅसटंचाईच्या स्वरूपात भारतातही धग जाणवली. त्याबाबींचा आधार घेऊन मोदी म्हणाले, केंद्र सरकारने सर्वप्रथम १०० टक्के एलपीजी कव्हरेजवर भर दिला. आता आपला फोकस पाईप्ड गॅस पुरवठ्यावर आहे.
सीएनजी आधारित व्यवस्थेलाही प्रोत्साहन दिले जात आहे. त्या सर्व प्रयत्नांमुळे भारत जगासमोरील मोठ्या ऊर्जाविषयक पेचाची योग्य प्रकारे हाताळणी करत आहे.
सौर ऊर्जेविषयी भारताने जगातील आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवले आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलसंदर्भातही देशाने अभूतपूर्व कार्य केले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.





