शहाजहाँपूर : उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांत कोडिन-आधारित कफ सिरपच्या अवैध साठवणूक व विक्रीप्रकरणी आतापर्यंत ७४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७५ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थ व संसदीय कार्यमंत्री सुरेश खन्ना यांनी शनिवारी दिली. माध्यमांशी संवाद साधताना खन्ना म्हणाले की, या कारवाईत सुमारे १२.६५ लाख कोडिनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून १३२ कंपन्यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या रॅकेटच्या चौकशीसाठी पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. एसआयटीने आतापर्यंत १५ मुख्य सूत्रधारांवर कारवाई केली असून १२ आरोपींविरुद्ध लुक-आउट सर्क्युलर जारी करण्यात आले आहेत. तपासात बनावट बिलांच्या आधारे मोठ्या प्रमाणात कफ सिरप गैर-वैद्यकीय वापरासाठी वळवून नेपाळ व बांगलादेशात तस्करी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. खन्ना यांनी दावा केला की, या प्रकरणातील काही आरोपींचे समाजवादी पक्षाशी संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कोडिनयुक्त कफ सिरपच्या अवैध व्यवहाराविरोधात ही मोहीम सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.