Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी स्फोटके जप्त; परिसरात उडाली मोठी खळबळ
पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी प्री-व्हिजिट सॅनिटायझेशन मोहीम राबवली जात असताना हे स्फोटक साहित्य पोलिसांच्या निदर्शनास आले.

Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी पोलिसांनी आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रापासून सुमारे ३ किमी अंतरावर फूटपाथवर दोन जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत.
पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी प्री-व्हिजिट सॅनिटायझेशन मोहीम राबवली जात असताना हे स्फोटक साहित्य पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.
हा भाग सुरक्षित करून आसपासच्या परिसरात सखोल तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
हे स्फोटक साहित्य बांधकाम कामातील हलगर्जीपणामुळे तिथे राहिले की पंतप्रधानांच्या दौऱ्यात व्यत्यय आणण्यासाठी मुद्दाम ठेवले होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.
व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या दृष्टीने बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत.





