नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थकारणावरून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची प्रशंसा केली. त्याबद्दल उमर यांनी आभार मानले. मॅडम, आम्हाला पैसेही पाठवा, असे निर्मळ साकडेही त्यांनी घातले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात देशातील विविध नेते सहभागी झाले. त्यावेळी बोलताना सीतारामन यांनी जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेविषयीही भाष्य केले. केंद्रीय राजवटीच्या काळात जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली. मात्र, काही बाह्य घटकांमुळे तेथील महत्वाचे पर्यटन क्षेत्र प्रभावित झाले. त्यानंतर तेथील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आमचे कार्य सुरूच आहे. मला उमर यांच्याही प्रयत्नांचा उल्लेख करावा लागेल. पर्यटन क्षेत्र ठप्प झाल्यानंतर त्यांनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या प्रयत्नांवर फोकस केला. त्यांनी माझी दोनवेळा भेटही घेतली, असे त्या म्हणाल्या. सीतारामन यांनी केलेल्या प्रशंसेवर नंतर त्याच कार्यक्रमात बोलताना उमर यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकार आम्हाला निश्चित आर्थिक मदत करतेय. पण, उपलब्ध होणारा निधी अपुरा ठरतोय. त्यामुळे आम्हाला अधिक निधी मिळावा, अशा आशयाची भूमिका त्यांनी मांडली.