Naseem Khan : निवडणूक आयोग राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे वागतोय; माजी मंत्री नसीम खान यांची टीका
काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan) यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.

Naseem Khan : काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan) यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
निवडणूक आयोग एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत आहे,” असा खळबळजनक आरोप करत, जर ईव्हीएम पडताळणी न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहिलेल्या नसीम खान (Naseem Khan) यांनी ईव्हीएममध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, १६ आणि १७ एप्रिल रोजी बोरिवली येथे काही ईव्हीएमची छाननी प्रक्रिया सुरू आहे.
मात्र, मतदानाच्या आकडेवारीसोबत ईव्हीएमची पडताळणी करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही, आयोग त्याचे पालन टाळत असल्याचा दावा खान यांनी केला आहे. नसीम खान यांच्या मते, आयोगाची प्रमाणित कार्यपद्धती सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांशी विसंगत आहे.
“केवळ कंट्रोल युनिट (सीयु), बॅलेट युनिट (बीयु) आणि व्हीव्हीपॅट जोडून त्यांचे प्रात्यक्षिक दाखवणे म्हणजे पडताळणी नव्हे. खरी पडताळणी ही मते आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स यांच्या जुळणीतून झाली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या संदर्भात त्यांनी आयोगाला निवेदनही सादर केले आहे.
लोकशाही रक्षणासाठी लढा
लोकशाहीत निवडणुका मुक्त आणि पारदर्शक असणे हे आयोगाचे कर्तव्य आहे, याची आठवण करून देत खान (Naseem Khan) म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. हा प्रश्न केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा आहे.
पारदर्शकता न राखल्यास न्यायव्यवस्थेचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे आता ईव्हीएम पडताळणीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, यावर निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






